सूडबुद्धीच्या राजकारणाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी सज्ज व्हा-दिलीप प्रधान
सध्या देशांत लोकशाहीची भयंकर थट्टा सुरु आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. देशभरातील आपल्या राजकीय विरोधकांना आणि त्यातही देशांतील प्रादेशिक पक्षांना संपविण्याचा विडा उचललेल्या भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांच्या अतिशय कुटील आणि सूडबुद्धीच्या अशा राजकारणाला आज महाराष्ट्र, आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस बळी पडलेला आहे. सुमारे ५६ वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे व्यंगचित्रकार बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे यांनी आपले वडील आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक अग्रणी प्रबोधनकार ठाकरे यांच्या आज्ञेवरून, १९ जून १९६६ रोजी, “मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी” शिवतीर्थावर स्थापन केलेल्या “शिवसेना” या लढाऊ बाण्याच्या, राष्ट्रवादी विचारांच्या एका राजकीय पक्षाचा भारतीय जनता पक्षाने आपल्या सूडाच्या राजकारणात बळी घेतला …आणि महाराष्ट्रातील मराठी माणूस पोरका झाला..!!*
भाजपाने पाठीत खंजीर खुपसला..
काय दुर्दैव आहे पहा ..! मला वाटत, सुमारे ३५ वर्षांपूर्वी, बाळासाहेब ठाकरे यांनी, त्या काळात, महाराष्ट्रांत कोणताही जनाधार नसलेल्या, या भारतीय जनता पक्षाशी राजकीय युती करून त्याला शिवसेनेचा ‘लहान भाऊ’, म्हणून, बोटाला धरून आपल्या सोबत महाराष्ट्र्भर फिरवले. त्यावेळी युतीत भाजपाला शिवसेनेचा लहान भाऊ समजला जात असे. कारण, या दोन्ही पक्षांच्या त्या वेळी झालेल्या युतीत महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांपैकी शिवसेना १७१ आणि भाजपा ११७ जागा लढवत असे. तर अशा या एके काळच्या या लहान भावाने, शिवसेनाप्रमुखानी त्याच्यावर केलेल्या त्या उपकारांची जराही जाणीव न ठेवता, आपल्या राजकीय फायद्यासाठी, आपल्या या मोठ्या भावाच्या पाठीत खंजीर खुपसून त्याला संपविण्याचे एक महापातक आज केले. जीवापलीकडे जपून मोठ्या कष्टाने वाढविलेल्या आपल्या त्या शिवसेना या संघटनेची भाजपाच्या या स्वार्थी आणि विस्तारवादी राजकारणात, झालेली वाताहत बघून स्वर्गातही, केवळ बाळासाहेबांच्याच नव्हे तर शिवसेनेशी आणि बाळासाहेबांशी वर्षानुवर्षे अत्यंत प्रेमाचे आणि सलोख्याचे संबंध असलेल्या आणि शिवसेना-भाजपच्या त्या खऱ्या खुऱ्या युतीचे शिल्पकार असलेले प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या सारख्या शिवसेनेच्या सच्चा हितचिंतकांच्या डोळ्यातून देखील स्वर्गात अश्रू ओघळले असतील. कारण या सगळ्यांचे त्या शिवसेनेवर,मनापासून प्रेम होते आणि शिवसेनेने देखील या सगळ्यांवर काहीही हातचे न राखता, मनापासून प्रेम केले. त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाची शिवसेनेशी असलेली ती युती ही प्रेमावर, भावनेवर, वचनांवर आणि दिलेल्या शब्दांवर आधारित असलेली खरीखुरी अशी एक वैचारिक युती होती. कारण त्या काळांतील भाजपामध्ये आजच्यासारखा फसवेगिरीला आणि कपटनीतीला जराही थारा नव्हता.
असो, गेल्या काही महिन्यांपासून भारतीय जनता पक्षाच्या भजनी लागून, मूळ शिवसेनेला संपविण्याचा विडा उचललेल्या आणि त्यासाठी शिवसेनेनतून फुटून बाहेर पडलेल्या आणि सुरत, गुवाहाटी ते गोवा असा प्रवास करून आलेल्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा हेतू साध्य झाला. आणि या शिंदे गटाने केवळ उद्धव ठाकरे यांच्यावरील असूयेपोटी हिंदुत्वाशी आणि बाळासाहेबांच्या विचारांशी उद्धव ठाकरे यांनी प्रतारणा केल्याची खोटी करणे देत ,कृतघ्नपणे बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या मूळ शिवसेनेचे भाजपच्या मदतीने "कुऱ्हाडीचा दांडा गोत्यास काळ" या न्यायाने दोन तुकडे पाडले. या सगळ्या दुःखद घडामोडीतून शिंदे गटाला आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना एक "आसुरी आनंद” मिळाला असे म्हटले तर ते नक्कीच चूक ठरणार नाही.
जणू काही एखाद्या नाटकाचे स्क्रिप्ट …
कस घडलं हे सगळं ..? सगळंच अगदी ठरवून केल्यासारखं. जणू काही एखाद्या नाटकाचे स्क्रिप्ट असल्यासारखं. सगळी पात्र योजना पूर्ण झाली होती. या राजकीय नाट्यांतील सगळ्या पात्रांकडून त्यांचे संवाद घोकून घेतलेले होते. या नाटकातील मुख्य पात्रांनी आपली भूमिका कशी करायची याचे व्यवस्थित दिग्दर्शन त्यांच्या दिग्दर्शकांनी केलेलं होत, आणि लोकेशन्सही आधीच ठरलेली होती. रिहर्सल झाल्या होत्या. सगळे कसे एकदम “ओक्के” घडत गेले. एकदम परफेक्ट. कुठे काहीही चूक नाही. सगळा प्लॉट एकदम परफेक्ट. पहिले सुरत मग गुवाहाटी आणि शेवटी गोवा. सगळे नाचत काय होते. केक काय कापत होते. फोटो काय काढत होते. एकमेकाला पाया काय पडत होते. ज्या आईने दूध पाजले त्या शिवसेनेच्या काळजात खंजीर खुपसला गेला होता. निर्लज्जपणाचा अगदी कळस झालेला होता. या सगळ्यांनी लोकशाहीची,शिवसेनेची आणि त्यांच्यासाठी झटलेल्या शिवसेनेच्या सामान्य कार्यकर्त्याची एक भेसूर थट्टा केली होती. सुरतेहून गुवाहाटीला जाण्यासाठी यातील अनेक आमदारांना विमानात अक्षरश: फरफटत नेले होते आणि दूरदर्शनवर ते दृश्य बघितल्यावर अवघ्या महाराष्ट्राला या आमदारांची आणि खासदारांची अक्षरशः लाज वाटली. ते बघून मनात विचार आला, माणसं सत्तेसाठी, पैशासाठी लाचार होऊन इतकी खालच्या ठरला जाऊ शकतात..? बाळासाहेबांच्या विचारांचे सतत दाखले देणाऱ्या या फुटीरांनी शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेबांनी हरेक शिवसैनिकाला शिकविलेला मराठी बाणा आणि स्वाभिमान या भाजपाकडे गहाण ठेवला होता. मात्र त्यातही एका आमदाराचा तो स्वाभिमान जागा झाला. आमदार नितीन देशमुख जिगरबाज निघाला..! त्याने आपला स्वाभिमान खोक्यांकरिता विकला नाही. आणि तो मात्र या सगळ्यांची नजर चुकवून तेथून पळाला. देशमुख कित्येक मैल चालत चालत गेला आणि मिळेल त्या वाहनाने त्याने मुंबई गाठली आणि थेट उद्धव ठाकरे यांच्याकडे आला. कारण नितीन देशमुख हा बाळासाहेबांच्या विचारांचा होता. खरं तर प्रत्येक सच्चा शिवसैनिकाने शिवसेनेचा झालेला हा अपमान विसरू नये आणि मनात धगधगत ठेवावा, म्हणून मी पुन्हा एकदा या सगळ्या घटनांची आठवण करून देत आहे…
शिवसेनेने सर्वाना सत्तेचे दरवाजे खुले करून दिले…
शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या अतिशय सशक्त अशा या दृष्टिकोनामुळेच केवळ काही वर्षेच नव्हे तर अनेक तपे ज्यांना सत्तेची दारे खुली झाली नव्हती अशा सर्वाना शिवसेनेने सत्तेचे दरवाजे खुले करून दिले. त्यामुळे या महाराष्ट्रातील असंख्य तरुणांना जनसामान्यांची सेवा करण्याची संधी पहिल्यांदाच मिळाली. पुढे नंतर शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी निवड झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीदेखील बाळासाहेबांचा हाच आदर्श आपल्यापुढे ठेवला आणि यातील अनेकांना सत्तेच्या आसनावर नेऊन बसवले..! जर हे सगळे शिवसेनेऐवजी भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस या सारख्या पक्षात असते तर ते आजपर्यंत साधे सरपंच किंवा नगरसेवक तरी झाले असते का असा एक विचार अनेक वेळा माझ्या मनात येतो. मला आजही माहीत आहे भाजपा आणि काँग्रेस सारख्या पक्षांत अजूनही असे अनेक कार्यकर्ते आहेत, ज्यांना पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करूनसुद्धा अजूनही साधे जिल्हापरिषदेपर्यंत अथवा नगरसेवकपदापर्यंतही जाता आलेले नाही, मग आमदार आणि खासदारपद अथवा मंत्रिपद तर दूरचीच गोष्ट आहे. पण शिवसेनेची बातच निराळी होती.
जुने शिवसैनिक खऱ्या अर्थाने एकनिष्ठ राहिले..कुणा कुणाची नावे लिहू ..?
आज ही सगळी फुटीर मंडळी, शिवसेनेत राहून राजकीय दृष्ट्या आणि आर्थिक दृष्टीनेही मोठे झाले ते केवळ शिवसेना आणि ठाकरे यांच्यामुळेच. या सगळ्या आमदार खासदारांनी, एखाद, दुसरा अपवाद सोडता, शिवसेनेसाठी असा कोणताही त्याग केलेला नाही की जो शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळांतील शिवसैनिकांपेक्षा मोठा होता. शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळांतील शेकडो शिवसैनिकांनी आपल्या घरादारावर निखारा ठेवून बाळासाहेबांच्या शब्दाखातर या संघटनेसाठी खूप काही केलं. पण त्या शिवसैनिकांनी या आमदार, खासदारांच्या प्रमाणे आयुष्यात कसल्याही अपेक्षा ठेवल्या नाहीत. ते सगळे जुने शिवसैनिक प्रथम बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आज उद्धव ठाकरे आणि शिवसेनेशी अजूनही खऱ्या अर्थाने एकनिष्ठ राहिले. या फुटीरांनी शिवसेनेचे जे धिंडवडे काढले ते बघून या शिवसैनिकांचे रक्त आजही उसळते आणि आजही त्यांचे हात शिवशिवतात. माझ्या आठवणीत असे शेकडो शिवसैनिक आहेत, जे या फुटीनंतर, व्यक्तिशः माझ्याशी या फुटीरांना अक्षरशः शिव्या घालत, जुन्या आठवणींना उजाळा देत बोललेले आहेत. शिवसेनेच्या या शिवसैनिकांनी संघटनेसाठी काय काय भोगलेले आहे, हे जर या फुटीरांना सांगितलं तर त्यांच्या तोंडाला फेस आल्याशिवाय राहणार नाही. कुणा कुणाची नावे लिहू ..?
ते फक्त संधीसाधू होते
महाराष्ट्राचे काय दुर्दैव आहे पहा..!! ज्या ठाकरे कुटुंबांनी शिवसेनेच्या माध्यमातून 'पानटपरी' वाल्यांपासून ते अगदी 'रिक्षावाल्यापर्यंत' अशा नुसत्या सामान्यच नव्हे तर अति सामान्य परिस्थितील महाराष्ट्रातील या मराठी माणसांना सत्तेचे सोपान दाखविले, नेते बनविले, समाजात आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली, मानमरातब मिळवून दिला, तेच आज बेडकी सारखे फुगून स्वतःला बैल समजू लागले आणि शिवसेनेसाठी आणि येथील मराठी माणसांसाठी आपणच प्रचंड त्याग केला असल्याच्या अविर्भाव आणत, ठाकरे कुटुंबियांवर फुरफुरू लागले. एव्हढेच नव्हे तर आपणच बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे खरे वारसदार आहोत अशा थाटात शेखी मारत महाराष्ट्रातील जनतेपुढे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपुढे मिरवू लागले. यात अनेक जण असे आहेत की ज्यांचा शिवसेनेशी या पूर्वी कधी संबंधही आलेला नव्हता. वास्तवात ते शिवसेनेचे कधी साधे कार्यकर्तेही नव्हते. म्हणजे आज जे आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आणि त्यांच्या हिंदुत्वाचे पाईक आहोत, असे अगदी कंठशोष करून सांगत आहेत त्यांचा आणि शिवसेनेचा वास्तवात कधीही संबंध नव्हता. ते फक्त संधीसाधू होते.
या पैकी अनेक जण सगळं गाव फिरून शिवसेनेत आले…
उदाहरणार्थ, दीपक केसरकर हे जे आज शिंदे गटाचे प्रवक्ते म्हणून मोठ्या ढोंगीपणे आपले मत न्यूज चॅनल्सवर मांडत असतात, ते वास्तविक पाहता २०१४ साली सगळं गाव फिरून शिवसेनेत आले. त्या आधी ते २००४ मध्ये काँग्रेसमध्ये होते. नंतर ते २००९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मधून आमदार झाले. बाळासाहेबांच्या निधनानंतर हे केसरकर दोन वर्षांनी शिवसेनेत आले. तरीसुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांना २०१४ मध्ये आमदार केले आणि अर्थ खात्याचे राज्यमंत्री केले आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री केले. २०१६ मध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांना गृह खात्याचे राज्यमंत्री आणि अर्थ आणि नियोजन खात्याचाही कार्यभार अशा महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. नंतर २०१९ मध्ये त्यांना विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडले. आता बघा, गाव फिरून आलेल्या या माणसाला, जो कधी शिवसेनेत येण्याआधी बाळासाहेबांना भेटलाही नसेल, त्याला विश्वास ठेवून उद्धव ठाकरे यांनी त्याच्या लायकीपेक्षा कितीतरी अधिक दिले तरीही त्याने शिवसेनेशी गद्दारी केली आणि वर तोंड करून दांभिकपणे स्वतःला बाळासाहेबांच्या विचारांचा पाईक म्हणवून घेतो. खरं तर अशी गद्दारी करताना याला जरा तरी लाज वाटली पाहिजे होती पण नाही ...म्हणतात ना "निर्लज्जम सदासुखी". जी कथा या केसरकराची आहे तीच थोड्याफार फरकाने शिवसेनेशी गद्दारी केलेल्या या आमदार आणि खासदारांचीही आहे.
२०१४ साली एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनीच प्रथम कॅबिनेट मंत्री केले.
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांचे तरी काय ..? १९९७ साली वयाच्या ३३ व्या वर्षी शिवसेनेच्या तिकिटावर ते ठाणे महापालिकेत नगरसेवक झाले आणि २००४ साली ते प्रथम विधानसभेत गेले. नंतर २००९ ला दुसऱ्यांदा निवडून आले. पण खऱ्या अर्थाने त्यांना शिवसेनेत बळ दिले ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेतेपद आणि कॅबिनेट मंत्रिपद देऊन. ऑक्टोबर २०१४ मध्ये एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्ष नेता केले आणि लगेच २०१४ ते २०१९ अशी पांच वर्षे त्यांना उद्धव ठाकरे यांनी युतीच्या सरकारात पी डब्ल्यु डी खात्याचे कॅबिनेट मंत्री केले. त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार मध्ये त्यांना या सरकारचे मुख्यमंत्री झालेल्या उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या बरोबरीचे आणि तोलामोलाचे नगरविकास खात्याचे महत्वाचे कॅबिनेट मंत्रिपद दिले. मुलाला खासदारकी दिली. अजून काय करायचे बाकी राहिले होते..? हाच प्रश्न त्यांना उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील सभेत विचारला. अहो शिंदेंजी तुमच्या ठाण्यात तुमच्याइतकेच किंबहुना तुमच्यापेक्षाही हुशार आणि तोलामोलाचे काय कमी लोक शिवसेनेत होते..? अहो, तुमच्यासारखे असे आजही अनेकजण ठाण्यात आहेत, पण त्यांच्या दुर्दैवाने त्यांना तुमच्यासारखी संधी मिळू शकली नाही हे तुमचे सुदैव.
सतत चिरकणारे गुलाबराव की जुलाबराव
नंतर जळगावचे ते गुलाबराव पाटील जे येता जाता उद्धव ठाकरे यांच्या नावाने गळा काढून बोंबलत असतात, त्यांचाही शिवसेनेतील राजकीय उदय १९९९ साली झाला. १९९९ साली आमदार २००४,२००९ असे पुन्हा आमदार आणि २०१४ मध्ये पुन्हा निवड आणि नंतर २०१६ ते २०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्या कृपेने महाराष्ट्र सरकारात सहकार मंत्री. नंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार मध्ये कॅबिनेट मंत्री. काय काय मिळाले या सगळ्यांना. शिवसेनेसाठी असा काय त्यांनी त्याग केलाय यांनी ते तरी एकदा कळू दे जुन्या शिवसैनिकांना..!! अहो कधी स्वप्नातही नसते मिळाले ते शिवसेनेने यांना दिले आणि तेही २०१४ नंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख झालेल्या उद्धव ठाकरे यांनी दिले हे लक्षात घ्या. अहो, फक्त २० वर्षांत पान टपरीवाल्या गुलाबचा शिवसेनेमुळे गुलाबराव झाला..!! शिवसेनेत प्रथम बाळासाहेब आणि नंतर उद्धव ठाकरे यांच्या कृपेने या सगळ्यांची राजकीय आणि आर्थिक प्रगती अतिशय वेगाने झाली. या देशात एक शिवसेना सोडली तर कुठल्या राजकीय पक्षात इतक्या वेगाने प्रगती होते ..?
यांच्यासारखे असे अनेकजण ज्यांची शिवसेनेत आल्यामुळे अतिशय वेगाने राजकीय आणि त्यामुळे आर्थिक प्रगती झाली. आणि मग हळू हळू हे स्वतःला स्वयंप्रकाशी समजू लागले. शिवसेनेच्या ऐवजी हे सगळे जर आज भाजपा किंवा काँग्रेस सारख्या पक्षात असते तर आजपर्यंत सरपंच किंवा जिल्हा परिषदेचे सभासद तरी झाले असते का असा एक विचार मनात येतो. कारण यांच्यापेक्षाही अनेक हुशार,प्रामाणिक आणि प्रगल्भ नेते वर्षानुवर्षे आजही या पक्षात आपली राजकीय कारकीर्द घडविण्यासाठी धडपडत असल्याचे चित्र दिसते.
२०१४ साली आमदार, खासदारपदी उभे रहाण्यासाठी शिवसेनेची तिकिटं आणि मंत्रीपदे कोणी दिली..? उद्धव ठाकरे यांनीच ना..?
त्यामुळे हे जे हिंदुत्वाच्या आणि बाळासाहेबांच्या विचारांच्या खोट्या आणि ढोंगी बाता मारून शिवसेनेतून फुटले, त्या सगळ्यांना २०१४ साली आमदार, खासदारपदी उभे रहाण्यासाठी शिवसेनेची तिकिटं आणि तसेच पुढे मंत्रीपदे कोणी दिली..? ही फक्त आणि फक्त शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच दिलेली होती हे आपण लक्षात घेतले पाहिजे. कारण २०१२ मध्ये बाळासाहेबांच्या झालेल्या निधनानंतर संपूर्ण शिवसेनेचा कारभार हा शिवसेनेचे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे हेच पाहत होते. तेव्हा हे सगळे उद्धव ठाकरे यांच्या पुढे मागे गोंडा घोळत होते त्यामुळे हे जे आज शिवसेनेला संपवून उठ सुठ एका वैफल्यापोटी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत.
माझ्या आठवणीप्रमाणे, बाळासाहेब ठाकरे यांनी सक्रिय राजकारणातून २००३ नंतर हळू हळू निवृत्ती घेतल्यानंतर, बाळासाहेबांचाच संमतीने उद्धव ठाकरे हे अधिकृतपणे शिवसेनेचा कारभार बघत होते. २०१२ मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे निधन झाल्यांनतर तर गेली १० वर्षे उद्धव ठाकरे हे एक हाती शिवसेनेचा कारभार पाहत होते. या सगळ्या कालावधीत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जोमाने वाढवली,याची बोलकी आकडेवारी उपलब्ध आहे. २०१४ मध्ये युतीचे सरकार आले,आणि तसेच शिवसेनेचे १८ खासदार लोकसभेत गेले. हेच २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीतही झाले. या सगळ्यांना २०१९ मध्ये शिवसेनेने पुन्हा तिकिटे दिली. २०१९ मध्ये सरकार स्थापनेवरून भाजपाचे नेते अमित शहा आणि भाजपशी उद्धव ठाकरे यांचे मतभेद झाल्यामुळे महाविकास आघाडी झाली. यातील अनेकांनी महाविकास आघाडीच्या सरकारात शिवतीर्थावर अगदी हसत हसत मंत्रिपदाची शपथ घेतली, सरकारी बंगले पटकावले आणि मंत्रिपदाची झूल अंगावर चढवून अडीच वर्षे लोकांच्यात छातीकाढून मिरवू लागले. आता हे सगळं पुन्हा एकदा सांगण्याचे कारण म्हणजे आज जे आमदार आणि खासदार शिवसेनेतून फुटले त्या सगळ्यांना २०१४ मध्ये आणि २०१९ मध्ये शिवसेनेतर्फे निवडणुकीची तिकिटे पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनीच दिली होती, आणि नंतर मंत्रिपदेही उद्धव ठाकरे यांनीच दिली होती. आता मात्र हे सगळे सोयीस्कररीत्या विसरले.
राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो..
कसं आहे, राजकारणात कोणीही कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो. काळ बदलतो तशी राजकीय समीकरणेही बदलत असतात. भाजपने फसविले, दिलेला शब्द फिरवला म्हणून महाविकास आघाडी झाली. बाळासाहेबांच्या काळातही असे बदल अनेकदा घडलेले होते पण शिवसैनिकांनी बाळासाहेबांवर विश्वास आणि निष्ठा ठेवत ते स्वीकारले.कारण ते सच्चे आणि निष्ठावन्त शिवसैनिक होते. पण आताचे सगळे सत्तेला चटावलेले होते.पण महाविकास आघाडीच्या वेळी या सगळ्यांचा पोटशूळ हा उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्री होण्याचा होता आणि आदित्य ठाकरे यांनाही मंत्रिमंडळात घेण्याचा होता. वास्तविक पाहता अनुभव नसतानाही, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या अडीच वर्षांच्या आणि विशेषतः कोव्हीढच्या काळांत उत्तम काम केले.सगळ्या देशाने त्यांचे कौतुकही केले. आदित्य ठाकरे यांचेही हिंदी,मराठी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असलेला एक हुशार आणि अभ्यासू मंत्री म्हणून कौतुकही झाले. ते सत्तेला चटावलेल्या काही जणांना सहन झाले नाही. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून यांना का नको होते, ते आता तुम्हीच ओळखा. कारण ते मुख्यमंत्री म्हणून या सगळ्यांच्या डोक्यावर बसलेले होते. आणि तेच या सगळ्यांना नको होतं. त्यातच त्यांच्या त्या विचारांना भाजपाने खतपाणी घातलं आणि त्यात हे सगळे बहकले. आज हा फुटीर गट भाजपच्या साहाय्याने शिवसेना फोडून वेगळा झालेले असेल, पण येत्या काही वर्षातच महाराष्ट्राच्या निवडणुका लागल्या की "शत प्रतिशत भाजपा" हा सिद्धांत असणारा भाजपाच यांची कशी वाट लावेल ते बघा. "ना घरका ना घाटका" अशी यांची अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही हे एक राजकीय विश्लेषक म्हणून माझे स्पष्ट मत आहे. शिवसेनेबरोबर ३५ वर्षे एका ताटात जेवलेला भाजपा सारखा कावेबाज आणि स्वार्थी राजकीय पक्ष शिवसेनेला उध्वस्त करू शकतो त्या भाजपाच्या लेखी या फुटीरांची काय किंमत असणार आहे ?
आता याची चौकशी कोणती ईडी करणार ..??
लिहिण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आता शिंदे गटाने वांद्रा कॉम्प्लेक्स येथे केलेल्या केलेल्या दसरा मेळाव्याचेच बघा ना ..! फुटीर शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी झाली. फिल्मफेअर अवॉर्ड ला करतात तसा सगळा सेट लागला होता. काय ते मैदान..काय ती रोषणाई, काय ते स्टेज...काय ती भाषणे ..व्वा व्वा..! कवी अशोक नायगावकरांच्या भाषेत सगळं कसं अगदी मॉडर्न.! सभेसाठी माणसे आणण्यासाठी एसटी च्या शेकडो बसेस वापरल्या गेल्या. दहा कोटी रुपये यासाठी खर्च केले गेले. एव्हढे पैसे मोजता मोजता एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या तोंडाला म्हणे फेस आला.याच्या बातम्या वर्तमानपत्रात आल्या. इतकी रोकड या गटाकडे आली कुठून याचीच चर्चा महाराष्ट्र्भर रंगली. आता याची चौकशी कोणती ईडी करणार ..?? या सगळ्यात महाराष्ट्रातील जनतेची दसऱ्याच्या सणासुदीला खेड्यापाड्यात एसटी नसल्यामुळे गैरसोय झाली ते वेगळेच. सत्ता बदलली होती. मुख्यमंत्र्यांची सभा, सगळेच मोर आणि लांडोर नाचत होते. शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे या मेळाव्यात सुमारे दिड तास चाललेले भाषण हा महाराष्ट्रात घरोघरी एक विनोदाचा विषय झाला. भाषण वाचताना का कुणास ठाऊक एकनाथ शिंदे हे चुकून तीच तीच पाने वाचत असावेत असं वाटलं. शाळेतील एखाद्या मुलाला शिक्षा दिल्यासारखे ते वाचत होते. शेवटी तेही दमले, आणि सुमारे दीड तासांनी त्यांनी ते वाचन थांबवले. शाळेतही त्यांनी इतकं कधी वाचलं नसावं. लोकांनी शिवतिर्थावरील उद्धव ठाकरे यांचे भाषण आणि वांद्रे कॉम्प्लेक्स मधील एकनाथ शिंदे यांचे भाषण यांची खूप तुलना केली. काही दिवस हाच विषय सकाळी मॉर्निग वॉक घेणाऱ्या लोकांना पुरून उरला. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न केला की हे असेच होते…तसेच शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे या सभेत फिल्मफेअर अवार्ड मधील हिरो च्या स्टाईलमध्ये लिफ्टने स्टेजवर आले म्हणे..! हा पण महाराष्ट्रात एक चर्चेचा विषय झाला होता . बाळासाहेबांचे विचार आता मॉडर्न झाले हे पाहून आमच्या सारख्या अनेकांना फारच गंमत वाटली. अर्थात हा सुद्धा एक विषय आम्हा मॉर्निग वॉक घेणाऱ्या लोकांना अनेक दिवस पुरून उरला..!
एकनाथ शिंदे यांचे हे भाषण सुरु असताना त्या सभेतील अर्ध्याहून अधिक माणसे तर उठून जात असल्याचे दूरदर्शनवर पाहाण्यास मिळाले. कारण मुळात ते कसलेही विचार ऐकायला आलेले नव्हते. त्यांना फसवून मुंबई बघायला चला म्हणून आणले गेले होते. त्यांना कोण शिंदे हे सुद्धा माहित नव्हते. काही जणांना आनंद शिंदे यांचे गाणे आहे असे वाटले. आणि हे सगळे आमच्या मनाचे नाही तर, मराठी वृत्तवाहिन्यांनी आणि वर्तमानपत्रांनी त्यांच्या मुलाखती घेऊन समोर आणले होते म्हणून आम्हाला कळले. यात सगळ्यात कहर म्हणजे, शिंदे गटाच्या या दसरा मेळाव्याच्या सभेसाठी, आलेल्या अनेक बसेसच्या पार्किंगची व्यवस्था मुंबई विद्यापीठाच्या कालिना येथील आवारात केलेली होती. त्या आलेल्या लोकांनी दारूच्या पिऊन टाकलेल्या बाटल्यांचा मुंबई विद्यापीठाच्या आवारात, अक्षरशः खच पडलेला होता. सभेच्या दुसऱ्या दिवशी ही बातमी महाराष्ट्रांतील सर्वच प्रमुख मराठी वर्तमानपत्रांनी दिली होती. काय लाज आणली होती पहा. विद्यापीठासारख्या एका पवित्र वास्तूची ही विटंबना नव्हे तर काय..? या देशांतील शिक्षणाची पंढरी असलेल्या या मुंबई विद्यापीठाच्या काय अवस्था करून टाकली होती. जगाच्या पाठीवरील कोणत्याही देशांत एखाद्या विद्यापीठाची इतकी विटंबना झाली नसावी. हे बाळासाहेबांचे विचार आहेत का...? अहो बाळासाहेब आपल्या दसरा मेळाव्या आधी नेहमी सांगत "वाजत गाजत या, गुलाल उधळत या, पण शिस्तीने या आणि शिस्त पाळा."
दुसरी गोष्ट शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरु असताना त्यांचे उद्बोधक विचार ऐकण्याऐवजी व्यासपीठावर बसलेले त्यांचे अनेक नेते अगदी चक्क झोपलेले होते तर काही जण मस्तपैकी पेंगत होते. विशेषतः कायम झोपेत बडबडणारे या गटाचे प्रवक्ते असलेले दीपक केसरकर तसेच शंभूराज देसाई अगदी मस्त झोपले असल्याचे टीव्हीवर दाखविले गेले. मला वाटत त्यांना बहुतेक विचारांचं अजीर्ण झाला असावं.
शेवटी, या सगळ्या घडामोडीत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, दुर्दैवाने शिवसेनेचे दोन तुकडे झाले. आणि या सगळ्या सूडनाट्याची परिणीती, भारतीय निवडणूक आयोगाने प्रबोधनकार ठाकरे यांनी या संघटनेचे ठेवलेले "शिवसेना" हे नाव आणि "धनुष्यबाण" हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह गोठवून इतिहासजमा केले. अर्थात,या सगळ्याच्या मागे महाशक्ती म्हणजे भारतीय जनता पक्ष होता आणि आहे हे आता लपून राहिलेले नाही. ते एक उघड सत्य आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी महाविकास आघाडी करून महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यामुळे, अतिशय सूडबुद्धीने सत्तेचा आणि बळाचा गैर वापर करून आणि सगळ्या यंत्रणांना हाताशी धरून शिवसेनेसारख्या एका राष्ट्रवादी विचारांच्या पक्षात फूट पाडली…आणि आमच्या विरोधात उभे राहण्याचे धाडस करणाऱ्या राजकीय पक्षाचे आम्ही काय करू शकतो हे या देशांतील त्यांच्या विरोधकांना दाखवून दिले. आणि हेच आज आपल्या देशाच्या लोकशाहीचे दुर्दैव आहे असे म्हटले तर ते चूक ठरणार नाही.
असो. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) हे नाव मिळाले.माझ्या दृष्टीने तो त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे आणि तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि तसेच "मशाल" हे निवडणूक चिन्ह म्हणून मिळालेले आहे. तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव आणि ढाल तलवार हे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने दिलेले आहे. अर्थात हे असे होणार हे अपेक्षितच होत. मला वाटत, या शिंदे गटाने जरी आपल्या पक्षाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव दिले असले आणि आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह जरी ढाल तलवार घेलेले असले तरी मूळ शिवसेनेचे विचार आणि लढण्याची जिद्द भाजपच्या दारात दावणीला बांधलेल्या या शिंदे गटाला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या विरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात यश मिळण्याची अजिबात शक्यता दिसत नाही हे मात्र नक्की. कारण महाराष्ट्रातील जनता हाती मशाल घेतलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेच्यामागे भरभक्कमपणाने उभी असल्याचे एक चित्र आज सर्वत्र दिसून येत आहे आणि याचा प्रत्यय मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत या शिंदे गटाला आल्याशिवाय राहणार नाही हे नक्की. आणि दुसरे महत्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे नाव ठाकरे हे आडनाव आणि त्यांचे विचार हे जन्मतःच मिळालेले असून ते निवडणूक आयोगाकडे मागून मिळालेले नाहीत हे या शिंदे गटाने लक्षात ठेवल्यास उत्तम.
सूडबुद्धीच्या राजकारणाची परिसीमा:
शेवटी, सध्याच्या या सूडबुद्धीच्या राजकारणाची परिसीमा म्हणजे शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांच्या अंधेरी पोटनिवडणुकीतील उमेदवार ऋतुजा लटके यांनी महापालिकेच्या सेवेत असल्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी आपल्या सेवेचा राजीनामा दिला असताना देखील, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांवर दबाव आणून तो राजीनामा मंजूर न करण्याची आणि त्यामुळे त्यांना निवडणुकीला उभे राहू न देण्याची एक गलिच्छ खेळी मुंबई महापालिका खेळत असल्याचे एक चित्र दिसत होते. एव्हढच नव्हे तर काहीही कारण नसताना त्यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणातही गोवण्याचा प्रयत्न केला गेला हे तर अतिशय खालच्या पातळीचे राजकारण खेळले गेले. त्याचा आज सर्वच स्तरातून निषेध व्यक्त होत होता. अर्थात उमेदवार ऋतुजा लटके यांनी दरम्यान महापालिकेच्या या अडवणुकीसंदर्भात उच्च न्यालयात एक याचिका दाखल केली होती. ऋतुजा लटके यांच्या याचिकेवर निकाल देताना या प्रकरणी उच्च न्यालयाने महापालिकेची कानउघाडणी केली आणि ऋतुजा लटके यांचा राजीनामा त्वरित स्वीकारण्याचे आदेश दिले. उच्च न्यालयाच्या या आदेशामुळे ऋतुजा लटके यांचा पोटनिवडणुकीला उभे राहण्याचा त्यांचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. पण या सगळ्यात जो दबावतंत्राचा वापर केला गेला तो मात्र अतिशय घृणास्पद होता.
*तेव्हा शिवसैनिकहो, उठा, यातून धडा घ्या आणि सूडबुद्धीच्या या राजकारणाला महाराष्ट्रातून हद्दपार करण्यासाठी सज्ज व्हा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांच्या परखड आणि राष्ट्रवादी विचारांच्या लाखो मशाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र्भर पेटवा आणि या फुटीरांना आणि सुडाचे राजकारण करणाऱ्यांना, आपली जागा दाखविण्यासाठी सज्ज व्हा आणि दाखवून द्या त्यांना शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे फक्त तुम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) हेच खरेखुरे वारसदार आहात ते...!!*
दिलीप प्रधान, मुलुंड, मुंबई
0 Comments