Ticker

6/recent/ticker-posts

वैनगंगा नदी पात्रात डोंगा उलटला, गणपुरच्या महिलांना जलसमाधी


वैनगंगा नदी पात्रात डोंगा उलटला, गणपुरच्या महिलांना जलसमाधी


जुनगाव: अजित गेडाम ✍️

गंगापूर टोक आणि गणपुर च्या मधोमध असणाऱ्या वैनगंगा नदीत कापूस वेचण्याकरिता डोंग्याच्या सहाय्याने नदीपार करत असताना नदीपात्रात डोंगा उलटल्याने डोंग्यातील सर्व महिला बुडाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी घडली.

डोंगा उलटल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने शोधमोहिम हाती घेतली. त्यानंतर दोन महिलेचा मृतदेह नदीच्या पात्रातून बाहेर काढण्यात आला. चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याला वैनगंगा नदी विभाजते. गडचिरोली जिल्ह्यातील गणपूर नदीच्या त्या काठावर आहे. एका बाजूला चंद्रपुरातील पोंभूर्णा तालुक्यातील गंगापूर टोक हे गाव आहे. गावातील शेतकऱ्यांच्या शेतात कापूस वेचणी करण्याकरिता गणपूर येथील 10 महिला डोंग्याने गंगापूर टोककडे निघाल्या होत्या. अशातच वाऱ्यामुळे डोंग्याचा तोल बिघडला व तो उलटला. डोंगा उलटताच एकापाठोपाठ त्यातील सर्व महिला नदीच्या प्रवाहात बुडाल्या. पुष्पा मुक्तेश्वर झाडे (वय 42), जिजाबाई दादाजी राऊत ( वय 55) यांचा यात मृत्यू झाला.

रेवंताबाई हरिश्चंद्र झाडे (वय 42), सुषमा राऊत (वय 25), माया राऊत (वय 45) ,सारणबाई कस्तुरे (वय 60), बुधाबाई राऊत व नावाडी सदाशिव मंढरे आदी अद्यापही बेपत्ता आहेत. नदीत बुडतानाच महिलांनी बचावाचा बराच प्रयत्न केला. पण त्यांना यश आले नाही. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून तातडीन शोध मोहिम हाती घेण्यात आली. चंद्रपूर व गडचिरोली येथील आपत्ती व्यवस्थापनाची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी तातडीन शोधाशोध सुरू केली. त्यात जिजाबाई आणि पुष्पा या दोघींचे मृतदेह हाती लागले. नावाडी सदाशिव मंडरे व सारूबाई कस्तुरे थोडक्यात बचावले.

बुडलेल्या इतरांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. गडचिरोलीचे उपविभागीय पोलिस आधिकारी मयूर भुजबळ, चामोर्शीचे उपविभागीय महसूल अधिकारी उत्तम तोडसाम, पोभुर्ण्याचे तहसीलदार शिवाजी कदम, चामोर्शीचे प्रशांत घुरडे, पोंभुर्णा ठाणेदार मनोज गदादे यांच्यासह प्रशासनाची पूर्ण टीम घटनास्थळी तैनात आहे. वैनगंगेच्या पात्रातून सापडलेले मृतदेह चामोर्शी येथील ग्रामीण रूग्णालयात नेण्यात आले आहेत. दोन डोंग्यातून ग्रामस्थ प्रवास करीत होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एकूण 13 लोक नदी पार करीत होते. पहिला डोंगा समोर निघाला. त्यामागे दुसरा डोंगा होता. दुसरा डोंगा उलटल्यानंतर समोरील नावाड्याने आपला डोंगा फिरवला. मात्र तो बुडण्यापासून वाचवू शकला नाही. वैनगंगेच्या पात्रात घडलेल्या या अपघातातील बेपत्ता महिलांचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर करण्यात येत आहे.
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून गाव शोक सागरात बुडाले आहे.

Post a Comment

0 Comments