विजय जाधव:काल दिनांक ८ एप्रिल 2023 ला नांदगाव गोवर्धन च्या मध्यंतरी श्री. भास्कर आंबटकर यांच्या मालकीच्या मक्याच्या पिकात वाघ आढळून आला. रस्त्याने जाणारे वाहनधारक प्रत्यक्ष वन विभागाचे अधिकारी कर्मचारी शेतकरी पादचारी या सर्वांनी वाघाचे दर्शन घेतले. सकाळी नऊ वाजता पासून वाघाला बघण्यासाठी असंख्य लोकांची गर्दी उसळलेली होती. तब्बल दोन तासाने वन विभागाचे कर्मचारी उपस्थित झाले. परंतु दिवसभरात वाघाला पकडण्याची कोणतीही कारवाई झाली नाही. सायंकाळी साडेसहा वाजता च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वन विभागातर्फे वाघाला पकडण्यासाठी पिंजरा लावला. तसेच वासराला पिंजऱ्यामध्ये ठेवण्यात आले. परंतु रात्री अकरा वाजेपर्यंत वाघ पिंजऱ्यात येऊ शकला नाही. रात्र झाल्याने बघ्यांची गर्दी कमी झाली. लोक आपापल्या घरी गेले. वन विभागाचे कर्मचारी वाघाला पकडण्यासाठी तैनात होते. प्रस्तुत प्रतिनिधीने आज सकाळी प्रत्यक्षात पाहणी करून भ्रमणध्वनी द्वारे संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याला विचारणा केली असता वाघ निघून गेल्याचे सांगण्यात आले. परंतु वाघ कोणत्या दिशेने गेला आणि कोण बघितले याची माहिती अद्यापही प्राप्त झाली नाही. यामुळे लावण्यात आलेला पिंजरा हटविण्यात येईल असे सांगण्यात आले वन विभागाच्या पिंजऱ्यात वाघ न अडकता पळून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये, कामगारांमध्ये, मजुरांमध्ये दहशत निर्माण झाली असून शेतकरी मजूर वर्ग भयभीत झालेला आहे. नांदगाव शेतशिवारात जवळपास दोनशे मजूर रोजगार हमीच्या कामावर आहेत. सद्यस्थितीत या परिसरात पाईपलाईनचे काम सुरू आहेत.गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याच्या कामावर अनेक मजूर काम करीत आहेत. शेतकरी आपल्या शेतात जाऊन शेती हंगामाची पूर्वतयारी करीत आहेत. अशातच वाघाची दहशत सुरू असल्याने शेतकरी वर्ग भयभीत झालेला आहे. मजूर कामावर जायला घाबरत आहे. रात्र फिरायला जाणारे व्यक्ती सुद्धा वाघाच्या भीतीने जाऊ शकत नाही. वन विभाग मात्र याकडे डोळे झाक करीत आहे. शेवटी वन विभागाचा पिंजरा खाली राहिल्याने अनेकांच्या मनात शंका उपस्थित होत आहे. वाघ पळून गेला की मक्याच्या पिकात आहे याची शाश्वती कुणीही देत नाही आहे.कॅमेरे लावून असताना वाघ पळून जाताना कॅमेरात कैद कसा झाला नाही. हा प्रश्न उपस्थित होत आहे. पाहिजे परंतु वाघ कॅमेरात का दिसत नाही हे सांगायला वनविभाग तयार नाही. यामुळे वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. यापूर्वी नांदगाव शेतशिवारात वाघ मेल्याची घटना ताजी असतानाच वाघ दिसून येत असलेल्या अनेक घटना घडन येत आहेत. परंतु वन विभाग यावर कोणतीही पाबंदी अथवा उपाययोजना करताना दिसून येत नाही. यामुळे वन विभागच निष्क्रिय असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आजही दि.९ एप्रिल रोजी रविवारी नांदगाव शेतशिवारातील दिलीप मंडलवार यांच्या शेतातील बाजूच्या पाणबठ्यावर वाघ आढळून आल्याचे शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले. याबाबतची माहिती प्रस्तुत प्रतिनिधींनी वन विभागाचे अधिकारी यांना देण्यासाठी भ्रमणध्वनी द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. यामुळे शेतात जायचे कसे? काम करायचे कसे? असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे. ========================== शेत शिवारात लपून बसलेला वाघ रात्री उशिरापर्यंत भास्कर आंबेडकर यांच्या शेतातून बाहेर निघून गेला. त्यामुळे लावण्यात आलेले पिंजरे आज काढण्यात येतील. -फनिंद्र गादेवार, वनपरिक्षेत्राधिकारी पोंभुर्णा
0 Comments