संपूर्ण महाराष्ट्रात गाजत असलेल्या दर्शना पवार हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल हांडोरे याला मुंबईतून अटक केली आहे.
आरोपीला पुण्यात आणण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती समजताच दर्शना पवारच्या आईने आणि भावाने आक्रमक भूमिका घेत संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
राहुलने माझ्या बहिणीचा घात केला आहे, आरोपीला आमच्या ताब्यात द्या नाही तर त्याला मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया दर्शनाच्या भावाने दिली आहे.
तसेच सोशल मीडियावरही आरोपी राहुल हांडोरेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.आरोपी राहुलने जसे माझ्या दर्शनाचे तुकडे केले, तसे मला राहुलचे तुकडे करायचे आहे, माझ्या मुलीला मीच न्याय देऊ शकते, असं म्हणत दर्शनाच्या आईने तिचा संताप व्यक्त केला आहे.
दर्शना पवार आणि राहुल हांडोरे हे राजगडावर फिरण्यासाठी गेले होते.
परंतु गडावरून फक्त राहुल बाहेर पडला होता.
काही दिवसांनंतर दर्शना पवारचा मृतदेह राजगडाच्या पायथ्याशी आढळून आला होता.
राहुल हांडोरे फरार झालेला असल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.
त्यानंतर आता पुणे पोलिसांच्या प्रयत्नांना अखेर मोठं यश आलं आहे.
आरोपी राहुल हांडोरे यांने दर्शनाची राजगडावर हत्या करत पळ काढला होता.
एमपीएससी पास झालेल्या दर्शनाची हत्या करण्यात आल्याने कोपरगावातील पवार कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
दर्शनाने रात्रंदिवस अभ्यास करत एमपीएससी परिक्षा पास केली होती.
तिला वनविभागात आरएफओची जागा मिळणार होती.
त्यामुळं दर्शनाचं अनेकांनी अभिनंदन केलं होतं, परंतु ती पुण्यात आली असता राहुलने तिची निर्घृण हत्या केली.
त्यानंतर आता दर्शनाच्या कुटुंबियांनी राहुल हांडोरेला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.राहुल हांडोरे हा मूळचा नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातल्या शाह गावाचा आहे.
त्याने विज्ञान शाखेत पदवीचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
तो पुण्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करत होता.
दर्शना आणि राहुल यांची ओळख पुण्यातच झाली होती.
मागील काही महिन्यांपासून दर्शना आणि राहुल एकमेकांच्या संपर्कात होते.
दोघे राजगडावर फिरायला गेल्यानंतर दर्शना अचानक बेपत्ता झाली.
गडाच्या पायथ्याशी दर्शनाचा मृतदेह आढळून आल्यापासून राहुल हांडोरे फरार झालेला होता.
0 Comments