Ticker

6/recent/ticker-posts

अधिकारी असावे तर...कुमार आशिर्वाद सारखे. 👉 चिखलातून वाट काढून पोहोचले आदिवासी पाड्यावर, 👉 महिलांशी साधला विविध विषयांवर संवाद

अधिकारी असावे तर...कुमार आशिर्वाद सारखे.


👉 चिखलातून वाट काढून पोहोचले आदिवासी पाड्यावर,

👉 महिलांशी साधला विविध विषयांवर संवाद...
गडचिरोली / चक्रधर मेश्राम दि. १६ जुलै २०२३:-

गडचिरोली या अतिदुर्गम व आदिवासी बहुल , नक्षलग्रस्त जिल्ह्यात बचत गटाच्या माध्यमातून महिला व्यवसायिकांना तसेच समाजातील उपेक्षित घटकातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. याकरिता शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीही खर्च केला जातो. मात्र याची योग्य अंमलबजावणी होत आहे का ? तसेच महिलांच्या काय समस्या आहेत? याची माहिती घेण्यासाठी गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चिखलातून वाट काढुन चक्क पाड्यावर जाऊन महिलांशी संवाद साधला.
तळागाळातील कुटुंबांना स्वयंरोजगार मिळावा व दारिद्र्य कमी होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे त्यासाठी शासन अनेकवविध योजना राबवित असते. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील महिला विशिष्ट उद्दिष्ट घेऊन एकत्र आल्यानंतर शासन या अभियानातून आर्थिक बळ देत असते. ग्रामीण भागातील महिलांना छोट्या उद्योगातून रोजगार निर्माण करून देण्यासाठी प्रयत्न केले जातात . 'उमेद' अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातही समुदाय संसाधन व्यक्तींची एक भक्कम फळी गावपातळी पर्यंत उभी करण्यात आलेली आहे. गाव पातळीवर मोठ्या प्रमाणात महिलांनी स्वयंरोजगार निर्माण केला आहे. याची प्रत्यक्ष पाहणी करून त्या महिलांशी थेट संवाद साधण्याकरिता मुख्याधिकारी कुमार आशीर्वाद मुलचेरा तालुक्यात पोहोचले. त्यांनी येथील अनेक गावातील बचत गटांच्या महिलांशी संवाद साधला. आणि सुरू असलेले प्रकल्प आणि वैयक्तिक तसेच सामूहिक उपक्रमांची पाहणी केली.
मुलचेरा तालुक्यात एकूण २७९ बचत गट कार्यरत आहेत. गोमनी परिसरात १६ ग्रामसंघ असुन त्यांना उमेद अभियाना अंतर्गत आर एफ, सी आई एफ, बँक लिंकिंग व्ही आर एफ ची सुविधा पुरविण्यात येत आहे. या ठिकाणी वेगवेगळे उपजीविका उपक्रम सुरू असून वैयक्तिक व सामूहिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. प्रभाग संघामार्फत गोमणी तलावात भविष्यात मत्स्यबीज उत्पादन केंद्र तयार करावयाचा असल्याने स्वतः मुख्याधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चिखलातून वाट काढून तलावाची पाहणी केली. एवढेच नव्हे तर वैयक्तिक कुक्कुटपालन केंद्राला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी परिसरातील बचत गटातील महिलांशी थेट संवाद साधत येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी महिलांनीही त्यांच्यासोबत मनमोकळेपणाने चर्चा करून विविध समस्या मांडल्या. स्वतः गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी कुमार आशीर्वाद यांनी चिखलातून वाट काढून विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या.यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भुयार, जिल्हा अभियान व्यवस्थापक (डी एम एम) उमेद चे प्रफुल भोपये, तालुका अभियान व्यवस्थापक रवींद्र मोहुर्ले, भूषण देवतळे, दीपक सहारे, प्रभाग समन्वयक कुमारी कमींद्रा कुमरे तसेच प्रभाग संघाचे अध्यक्ष सचिव उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments