अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकाची नुकसान भरपाई त्वरित द्या-अजय लोणारे
=============================
-१ जानेवारी पर्यंत नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्मदहनाचा इशारा
जीवनदास गेडाम, (विशेष प्रतिनिधी)
=============================
पोंभूर्णा:-नुकतेच अवकाळी पावसामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.मंगळवार आणि गुरूवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले. तालुक्यातील कापूस,धान,तूर व मिरची पिकाला पावसाचा मोठा फटका बसला आहे. हजारो एकरातील पिके नष्ट झाल्यामुळे सरकारने तातडीने शेतकऱ्यांना मार्केट रेट नुसार एकरी २० हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी वेळवा येथील शेतकरी अजय लोणारे यांनी पोंभूर्णा पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेतून केली आहे.तसेच सरकारने १ जानेवारी पर्यंत नुकसान भरपाई दिली नाही तर आत्मदहन करण्याचा इशाराही शेतकऱ्यांने पत्रकार परिषदेतून दिला आहे.
अवकाळी पावसाने मंगळवार व गुरूवारी थैमान घातल्याने तालुक्यातील हजारो हेक्टर धानाच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.तालुक्यात हजारो हेक्टर कापून ठेवलेला धानाचा कळपा पाण्याखाली आला असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.धान कापून व काढून घरात येण्याच्या तयारीत असताना पावसाने थैमान घातले असल्याने पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.शेतीची मशागतीपासून ते पीक निघेपर्यंतचा झालेला खर्च निघने कठीण झाले आहे.त्यामुळे कर्ज घेतलेले पैसे कसे द्यायचे हा प्रश्न भेडसावत असल्याने आत्महत्या केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे दुसरा उपाय उरला नसल्याचे चित्र आहे.तालुक्यात धान, कापूस, तूर, सोयाबीन,मिरचीचे पीक जास्त घेण्यात आले.या सर्व पिकांवर अवकाळी पाऊसाचा जास्त प्रमाणात परिणाम झाला आहे. कपाशी पीक या पाण्यामुळे गळून पडत आहे. मजुरांच्या प्रतीक्षेत बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील कापसाची वेचणी शिल्लक आहे.अशातच अचानक झालेल्या पावसाने कपाशीचे पीक काळे पडून नुकसान होणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.शेतीचा लवकरात लवकर पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.सरकार फक्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार असल्याची खोटी आश्वासने देऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला फक्त पाने पुसत असल्याचा आरोपही अजय लोणारे यांनी केले आहे.
--------
-दहा एकरातील धान कापणी केली होती.व अकरा एकरावर कापूस लावले आहे.परंतु पावसामुळे पूर्ण धान ओला झाला आहे.कापूसही गळून पडला आहे.शासनाने नुकसान भरपाई नाही दिल्यास मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहणार नाही.
-अजय लोणारे, शेतकरी,वेळवा
----------
अवकाळी पावसामुळे तालुक्यातील १७०० हेक्टर धान पिकांचे नुकसान झाले असल्याचे सर्व्हे करून अहवाल सादर केलेला आहे.-चंद्रकांत निमोड, तालुका कृषी अधिकारी, पोंभूर्णा
0 Comments