नांदगावच्या सरपंच वादाच्या भोवऱ्यात, घरकुल प्रकरणी प्रकल्प संचालकांनी मागितला खुलासा
कारवाई करण्याचा ग्रामीण विकास यंत्रणेचा इशारा
जुनगाव: ग्रामपंचायत रेकार्ड वरील जुनी घरकुल यादी प्रपत्र ड मधील 22 नावे कमी करून बोगस नवीन यादी तयार करून शासनाची फसवणूक केल्यासंबंधाने नांदगावच्या ग्रामपंचायत सरपंच एडवोकेट हिमानी ताई वाकुडकर यांना प्रकल्प संचालकांनी खुलासा मागविलेला आहे. व कारवाई करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलेला असल्याने ग्रामपंचायत वर्तुळात व घरकुल लाभार्थ्यांत खळबळ उडाली आहे.
मुल तालुक्यातील संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदगाव येथील ग्रामपंचायतीत कसल्या ना कसल्या भानगडी उपस्थित होत असतातच. सरपंच एडवोकेट हिमाणीताई वाकुडकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर आणि दुरुपयोग करून रेकॉर्डमध्ये फेरबदल करून आपल्या मर्जीतील लाभार्थ्यांची नावे टाकण्यात आल्याने आधीच्या लाभार्थ्यांवर अन्याय झालेला असून त्यांची नावे घरकुल यादीतून गायब करण्यात आलेली आहेत.
ग्रामपंचायत नांदगाव तालुका मुल येथे खोटे दस्तावेज तयार करून त्या आधारे ग्रामपंचायत रेकार्ड वरील जुने घरकुल प्रपत्र ड यादी मधील एकूण 22 लाभार्थ्यांची नावे कमी करून बोगस नवीन प्रपत्र ड यादी तयार करण्यात येऊन यादी पंचायत समितीला सादर करून शासनाची फसवणूक करणाऱ्या वर फौजदारी गुन्हा दाखल करून रुपये दहा लाख पन्नास हजार निधी गैरअर्जदाराकडून वसूल करण्याबाबतचे प्राप्त तक्रारीचे अनुषंगाने पंचायत समिती मुल कडून चौकशी करण्यात आली. व त्यानुसार चौकशी अहवाल कार्यालयास प्राप्त झालेला आहे.
चौकशी दरम्यान प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभार्थी निवड व लाभार्थी प्राधान्यक्रम ठरविणे इत्यादी बाबी या ग्रामसभेतून होणे क्रमप्राप्त आहे, परंतु ग्रामपंचायत स्तरावरून नियमबाह्य कारवाई झाल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबी करिता सरपंच यांना जबाबदार करण्यात आले आहे. त्यामुळे नागरी सेवा शिस्त व अपील १९६१ अ मधील नियम एक तरतुदीनुसार उचित कारवाई का करण्यात येऊ नये याबाबतचा स्वयं स्पष्ट खुलासा सरपंच एडवोकेट हिमानी ताई वाकुडकर यांना विचारण्यात आला असल्याने सरपंचावर कोणती कारवाई होते यावर ग्रामवासीयांचे लक्ष लागले आहे.
0 Comments