जिवनदास गेडाम (विशेष प्रतिनिधी)
चंद्रपूर: मुल तालुक्यातील बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नांदगाव येथे स्मशानभूमीत जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने गावकऱ्यांना अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे.
राजकीय दृष्ट्या अति संवेदनशील असलेल्या नांदगावात सर्व जाती धर्माचे लोक आहेत. 2011 च्या जनगणनेनुसार नांदगाव गावाची एकूण लोकसंख्या 1964 आहे. 497 कुटुंब या गावात असून गाव तसे शांतीप्रिय आहे. मात्र या गावात अनेक अडचणी असून म्हणावा तसा या गावाचा विकास झालेला नाही. धुरंधर पुढाऱ्यांचं गाव म्हणून गावाची ओळख असली तरी विकासाच्या दृष्टीने हे गाव खूप मागे आहे.
कित्येक वर्षांपूर्वी स्मशानभूमीत शेड बनवण्यात आला मात्र तो आता सद्यस्थितीत जीर्ण अवस्थेत आहे. रस्ता तर काही अंतरावर बनवलेला आहे मात्र जवळजवळ दीड ते दोन किलोमीटर अंतर रस्ता नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कारासाठी चिखल तुडवत नागरिकांना जावे - यावे लागत आहे. स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नाही. रस्त्यांच्या बाजूला काटेरी गवत व झुडपे निर्माण झाल्याने जाण्या येण्यासाठी वाट अवघड आहे.प्रत्येक स्मशानभूमीत हातपंप बसवण्यात आले आहेत मात्र या गावात तसला काही प्रकार दिसतच नाही. स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्यासाठी राजकीय पुढारी एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले पाहायला मिळतात परंतु गाव विकासासाठी एकत्रित प्रयत्न करण्याची तसदी कोणीही घेत नसल्यामुळे या गावाचा विकास खुंटला आहे.
हे गाव शैक्षणिक राजकीय व सामाजिक दृष्टीने विकसित असले तरी गाव पातळीवरील अनेक समस्या आजही जैसे थे असून येथील स्मशानभूमी सध्या समस्याच्या विळख्यात अडकल्याचे चित्र आहे. गावातील राजकीय पुढारी आपसी मतभेद व श्रेय वादाच्या लढाईत अडकल्याने समस्या वाढतच जात आहेत. त्यामुळे स्मशानभूमीची अवस्था कचऱ्यात स्मशान भूमि की स्मशानभूमीत कचरा अशी अवस्था झाली आहे. स्थानिक प्रशासनाने या गंभीर बाबीची दखल घेऊन स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता पक्का तयार करण्यात यावा अशी मागणी गावातील शेतकरी,शेतमजूर व नागरिकांनी केली आहे.
0 Comments