Ticker

6/recent/ticker-posts

आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करू - व्यंकट मुदीराज


आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास महाराष्ट्र सरकार विरोधात आंदोलन करू - व्यंकट मुदीराज

(विशेष प्रतिनिधी)
दरारा 24 तास
नांदेड:- मराठवाड्यातील आदिवासी कोळी समाजाचे प्रश्न न सोडविल्यास राज्य सरकारच्या विरोधात आंदोलन करणार असे प्रतिपादन अखिल भारतीय आदिवासी कोळी समाज संघटना नवी दिल्ली या संघटनेचे मराठवाडा प्रमुख मा.श्री. व्यंकट मुदीराज यांनी केले. ते दि. १६ जून २०२४ रविवार रोजी सकाळी ठिक १२.०० वाजता आदिवासी कोळी समाजाची नांदेड जिल्हास्तरीय बैठक गौरक्षण सभागृह, हनुमान मंदिर प्रांगण गोकुळनगर नांदेड येथे पार पाडली. यावेळी ते बोलत होते.

अध्यक्ष पदावरुन बोलताना ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की, गेल्या दहा बारा वर्षापासून कोळी महादेव व तत्सम अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र तपासणी समिती औरंगाबाद येथे संचिका हेतुपुरस्सर अडवून ठेवत आहेत. आठ हजार संचिका कोळी महादेव व तत्सम जमातीचे प्रलंबित असल्यामुळे दप्तर दिरंगाई कायदा २०२६ कलम मधील तरतुदीनुसार शासनाने संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अन्यथा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात तिव्र स्वरुपात आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी शासनाला दिला आहे.


यावेळी या बैठकीचे प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक छत्रपती संभाजीनगरचे आदिवासी कोळी समाजाचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. रमेश बावस्कर यांनी यावेळी समाजाला मार्गदर्शन केले. ते आपल्या भाषणात म्हणाले की, राज्य शासन जाणुन बुजून आदिवासी कोळी महादेव, कोळी मल्हार, तत्सम आदिवासी समाजाला डावलत असेल तर सत्तेत बसलेले २८८ आमदार ज्या ज्या मतदार संघात अन्यायग्रस्त आदिवासी समाजाची २० ते २५ हजार लोकसंख्या आहे त्या त्या मतदार संघात आदिवासी कोळी समाजाचे उमेदवार उभे करणार असे प्रतिपादन रमेश बावस्कर यांनी केले.

सर्वप्रथम श्री. रमेश बावस्कर यांच्या हस्ते श्री जगद्‌गुरु भगवान महर्षी वाल्मीकी ऋषी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी मराठवाडा उपाध्यक्षपदी मारोती बिच्चेवाड तर मराठवाड सरचिटणीसपदी मारोती कुकुटलावार यांची व्यंकट मुदीराज यांनी निवड केली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेश महिला अध्यक्ष सौ. किरण पोन्ना, नांदेड जिल्हाध्यक्ष पुंडलीक मोरे, एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड, सदाशिव बोईनवाड, सत्यनारायण मुदीराज, सौ. सारीका जिरोणकर, सौ. वैद्य, भालचंद्र मोळके, सत्यनारायण खेळगे, प्रशांत गड्डमवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले तर आभार प्रदर्शन पुंडलीक मोरे यांनी मांडले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments