जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना किसान क्रेडिट कार्डप्रमाणेच मिळणार क्रेडिट कार्ड*
चंद्रपूर, दि.21 नोव्हेंबर: मत्स्यव्यवसाय विभागामध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची प्रचंड क्षमता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मत्स्यव्यवसायाचा विकास व विस्तार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहू अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. रामाळा तलाव परीसर येथे जागतिक मत्स्यपालन दिनानिमित्य आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मत्स्यपालन करणाऱ्या बंधू-भगिनींना ऊर्जा देण्यासाठी हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. असे सांगून पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, या दिवसाची प्रासंगिकता आणि महत्व लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारची मत्स्यपालन संशोधन संस्था भुवनेश्वर येथे आहे. मात्र, महाराष्ट्रात कुठेही संशोधन संस्था नाही, त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात संस्थेची शाखा उघडण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यात माजी मालगुजारी तलाव आहेत. परंतू त्याठिकाणी मत्स्यसंगोपन करताना अडचणी येतात. धान उत्पादक शेतकऱ्यांना जेव्हा पाण्याची गरज भासते तेव्हा तलावातील पाणी सोडल्या जाते. त्यामुळे शेतकरी आणि मच्छीमार बांधवांमध्ये वाद निर्माण होतो. त्यामुळे येत्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्र्यांशी या विषयावर चर्चा करुन प्रश्न सोडविणार असल्याचेही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, नागपूर विभागात 6 हजारहून अधिक माजी मालगुजारी तलाव आहेत. या तलावांचे नूतनीकरणाचे कामे हाती घेण्यात येईल. विशेषत: मत्स्यपालनासाठी व त्यांच्या संरक्षणासाठी मोठा कृत्रिम खड्डा तयार करण्यात येईल ज्याचे पाणी माशांसाठी उपलब्ध होईल. मच्छीमार बांधवांची जाळी व बोटींची मागणी असून योजनेतून निश्चितच जाळी व बोटी उपलब्ध करून दिल्या जातील. जिल्ह्यातील मच्छिमार बंधू-भगिनींसाठी शासकीय योजना असून त्या शासकीय योजनांमधून अनुदान उपलब्ध करून दिले जाते. अनेक वर्षांपासून बोटीसाठी 3 हजार रुपये आणि जाळ्यांसाठी 1200 रुपये अनुदान दिले जात होते. त्या अनुदानात वाढ करण्यात येईल. अनुदानात वाढ केल्यानंतर जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना डिपीडीसीमधून जाळी उपलब्ध करून दिली जाईल. तसेच किसान क्रेडिट कार्डप्रमाणेच जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांना क्रेडिट कार्ड उपलब्ध करून देण्यात येईल. मच्छीमार बांधवांना क्रेडिट कार्डद्वारे, जाळी व बोटींची दुरुस्ती करता येईल. यावेळी तलावाच्या स्वच्छतेचे काम करणाऱ्या मच्छीमार बांधवांचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाला महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, सुभाष कासनगोट्टूवार, रविंद्र गुरनुले, प्रकाश धारणे, विशाल निंबाळकर, डॉ. दीपक भट्टाचार्य, रवि आसवानी, छबू वैरागडे, शिला चव्हाण, माया उईके, रवि लोणकर, दिनकर सोमलकर, विठ्ठल डुकरे, अरूण तिखे, प्रदिप किरमे, माया मांदाळे, प्रभा गुडधे, शितल आत्राम, अजय सरकार, बंडू हजारे, राकेश बोमनवार, रामकुमार आकापल्लीवार, रूद्रनारायण तिवारी, चॉंद सय्यद पाशा, इॅको प्रो चे बंडू धोत्रे, धनराज कोवे, धम्मप्रकाश भस्मे, प्रज्वलंत कडू, सुरज पेदुलरवार, यश बांगडे, संतोष, शंकर बक्कलवार, देवराव मंचर्लावार, लक्ष्मण तोकला, किसन पचारे, किशोर मंचर्लावार, विनोद आडेकर, रवि मंचर्लावार, संतोष तोकलवार, लवकेश गुम्मलवार, राजू गुम्मलवार, सुनिल मंचर्लावार, रूपेश तोकलवार यांची उपस्थिती होती.
0 Comments