चंद्रपूर: महसूल विभागातील दबंग अधिकारी म्हणून ओळख असलेले चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी मरूगनाथम एम. यांनी मागील दोन महिन्यात रेती तस्करांविरुद्ध धडाकेबाज कारवाई करीत अक्षरशः रेती माफीयांचे धाबे दणाणून सोडले आहे.
त्यामुळे रेती तस्करांकडून त्यांच्यावर सातत्याने पाळत ठेवली जात असून आता त्यांनाही हुलकावणी देत चंद्रपूर शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध रेतीची वाहतूक सुरू असल्याचे दिसत आहे.
२०२२-२३ या वर्षासाठी जिल्ह्यातील ३८ रेती घाटांचा लिलाव करण्यात आला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून रेतीचा उपसा सुरू आहे. लिलावात केलेल्या सर्व वृत्ती घाटातून एक लाख ८४ हजार १३३ ब्रास रेतिचा उपसा करण्यात येणार आहे. चंद्रपूर शहर हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. शहरात मोठ्या प्रमाणात शासकीय, निमशासकीय आणि खाजगी बांधकामे सुरू आहेत. चंद्रपूर एमआयडीसीतील अनेक उद्योग, चंद्रपूर वीज केंद्र, फेरो अलाय अनेक ठिकाणी बांधकामासाठी रेतीची प्रचंड मागणी आहे.
गंभीर बाब म्हणजे रेतीच्या या व्यवसायात अनेक राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी आहेत. दुसऱ्याच्या नावावर घाट घेऊन स्वतः दादागिरी करण्याचा पायंडाच पडला आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार प्रत्येक रेती घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे आणि रेतीची वाहतूक करण्या-या वाहनाला जीपीएस लावणे बंधनकारक आहे. मात्र हा नियम केवळ कागदावरच राहिलेला आहे. सकाळी एक टीपी काढून दिवसभर त्याच टीपीवर रेतीची वाहतूक केली जात आहे.
ठेकेदाराकडून घाटावर ठरवून दिल्यापेक्षा कितीतरी पटीने रेतीचा उपसा करण्यात येतो. खनीकर्म विभाग आणि तहसीलदारांकडून घाटाची पाहणी होत नाही. मोजमाप केले जात नाही. त्यामुळे रेती तस्करांचे बऱ्यापैकी फावले आहे. मात्र यावर्षी रेती तस्करांचा सामना थेट महसूल विभागातील "सिंघम" अशी ओळख असलेले चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी यांच्याशी सुरू आहे. भारतीय प्रशासकीय सेवेतून आलेले एसडीएम हे तरुण अधिकारी आहेत. त्यांची चंद्रपूर येथे प्रथमच नियुक्ती या पदावर झाली आहे. नियम पाडून काम करणे त्यांना आवडत असते. त्यांनी पदभार स्वीकारतात रेती चोरांच्या मुसक्या आवळणे सुरू केले. रेतीची वाहतूक करणाऱ्या अनेक वाहनावर त्यांनी कारवाई केली. त्यामुळे तस्करांमध्ये आता या अधिकाऱ्याची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. ते केव्हा कुठे जातील याचा कोणालाही थांग पत्ता नसतो. त्यामुळे त्यांचे वर पाळत ठेवण्यासाठी तस्करांनी टोळ्या निर्माण केल्या आहेत. तरीसुद्धा कधी वेगवेगळ्या रूपात, वेगवेगळ्या वाहनाने धडाकेबाज कारवाई सुरू आहे.
या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईची दखल घेत जिल्हाधिकारी विनायक घोडा यांनी सर्व रेती घाटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चंद्रपूरचे तहसीलदार निलेश गौंड यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्य जिल्हा दक्षता पथक स्थापन केले पण कुंपणाचे क्षेत्र खात असल्याने या पथकाकडून अपेक्षित कारवाई होताना दिसत नाही उलट काही दलालांमार्फत दक्षता पथकातील एका अधिकाऱ्याने रेती तस्करांशी स्वतंत्र बोलणे सुरू केल्याचे सांगितले जाते. त्यामुळे जिल्हा दक्षता पथक केवळ देखावा असल्याचे दिसते.
अलीकडे रेती तस्करांकडून आता या दबंग अधिकाऱ्यालाही हुलकावणी दिल्या जात असल्याच्या चर्चा आहेत. त्यांचेवर "टाईम टू टाईम" पाळत ठेवून शासकीय, निमशासकीय, खासगी तसेच मोठ्या उद्योगांच्या बांधकामासाठी पुरवठा सुरू आहे. विशेषता उपविभागीय अधिकारी हे शासकीय बैठकांमध्ये व्यस्त़ असताना रेती तस्करांकडून वाहतूक वाढवली जाते.
या अधिकाऱ्याच्या दहशतीमुळे काही दिवसांपूर्वी रेती तस्करांनी वाहतुकीचे मार्ग बदलले होते.चंद्रपुरात रेती पुरवठा करायचा नाही. तसेच चंद्रपूर शहरातूनही इतरत्र रेतीचे वाहतूक करायची नाही. अशी भूमिका तस्करांनी घेतली होती.परंतू आता पुन्हा रेती तस्करांनी अवैधरित्या वाहतूक सुरू केल्याने, नेमके बळ कोणाचे मिळू लागले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0 Comments