चंद्रपूर: जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यात आदिवासींचे विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन कालपासून सुरू असले तरी शासन आणि प्रशासनाने या आंदोलनाची दखलच घेतली नसल्यामुळे या आंदोलनात सहभागी झालेल्या दोन महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर हे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राज्यभरात उष्णतेची लाट पसरली आहे. चंद्रपूरात तापमान 45 अंशांच्या पुढे गेले आहे. अंगाची लाही लाही करणाऱ्या या तापमानात हजारो आदिवासींनी जिल्ह्यातील पोंभुर्णा शहरात रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन मंगळवारपासून सुरू केले आहे. या आंदोलनात अनेक महिलांनी सहभाग घेतला आहे. रणरणत्या उन्हामुळे आंदोलनातील दोन महिलांची प्रकृती खालावली असून त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
करिष्मा कुसराम, अर्चना कुळमेथे असे प्रकृती खालवलेल्या महिलांचे नाव आहे.
या घटनेनंतर हे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 50 टक्के आदिवासी बहुल असलेल्या गावांमध्ये पेसा कायदा लागू करावा, 50 वर्षांपासून कसत असलेल्या वनजमिनी आदिवासींना देण्यात याव्या, सुरजागड येथील अवजड वाहतूक बंद करावी, इको सेन्सिटिव्ह झोन रद्द करण्यात यावा आणि वन्य प्राण्यांकडून झालेल्या नुकसानीचा मोबदला वाढविण्यात यावा, अशा अनेक मागण्यांसाठी आदिवासींचे हे आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याच्या भूमिकेवर आदिवासी ठाम आहेत. या आंदोलनामुळे पोंभूर्णा-मूल आणि गोंडपिंपरी-मूल अशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. मंगळवारी पूर्ण रात्र आंदोलनकर्त्यांनी जागून काढली. तसेच दिवसभरात वाढत्या तापमानामुळे आणि रणरणत्या उन्हामुळे दोन महिलांची प्रकृती खालवली आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने कुठलीच खबरदारी घेतली नसल्याने या आंदोलनातील अनेकांची प्रकृती हा लावणार असल्याची माहिती प्राप्त होत आहे. आदिवासी जनतेच्या भरवशावर राजकारणाची पोळी शिकणाऱ्या राजकारण्यांनी आणि पालकमंत्र्यांनी मूळ निवासी असलेल्या लोकांची मागणी लक्षात घेतली नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल अशी भूमिका आंदोलन करत्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आता सरकारची सुद्धा पंचायत झाली आहे.
0 Comments