मुंबई - मुंबईत इमारत कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं दिसून येत आहे. आज विरारमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची भिंत कोसळून तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे.पाच कामगार या मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले होते, त्यातील तीन महिलांचा मृत्यू झाला असून दोन जखमी आहेत. ही घटना मंगळवारी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.
शाहूबाई अशोक सुळे (वय ४५), लक्ष्मीबाई बालाजी गावाने (वय ४५) व राधाबाई एकनाथ नावघरे ( वय ४०) अशी मृत महिलांची नावे आहेत. या दुर्घटनेत नंदाबाई अशोक गव्हाणे (वय ३२) आणि एक पुरुष मजूर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या ठिकाणी एकूण १२ मजूर काम करत होते. काही जण बाहेर निघाल्यामुळे ते वाचले.
मृत सर्व व जखमी मजूर हे नाका कामगार आहेत. ते मराठवाडा नांदेड, परभणी येथील मूळचे रहिवाशी आहेत. कामासाठी ते वसई, नालासोपारा, विरार परिसरात नाका कामगार म्हणून काम करत होते.
विरारच्या रेल्वे स्थानकाजवळ पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीचं फायलिंगच काम चालू होतं. त्यावेळी ही दुर्घटना घडली. विरार पोलीसठाण्यात घटनेची नोंद आहे.
पोलिसांनी सांगितले की, विरार रेल्वे स्टेशनजवळ पूर्वेच्या दिशेला स्नेहांजली इमारतीच्या बाजूला एका चालू बांधकामचं फायलिंगचं काम सुरु होतं. फायलिंगपासून चौदा फूट उंच भिंतीचं बांधकाम सुरू होते. दुपारच्या सुमारास अचानक एका बाजूची भिंत कोसळली आणि काम करत असलेल पाच मजूर ढिगाऱ्याखाली दबले गेले. या घटनेत तीन महिला मजुरांचा मृत्यू झाला आहे.
दुर्घटना घडलेल्या इमारतीचं नाव सूर्यकिरण आहे. ही जुनी इमारत सात वर्षापूर्वी पुनर्विकासासाठी बिल्डराला दिली होती. सात वर्षानंतर बिल्डरने नवीन इमारत बांधण्यास घेतली होती.
मात्र बिल्डराने सुरक्षेच्या कोणत्या उपाययोजना केल्या नव्हत्या तसेच बांधकाम निकृष्ट दर्जाचा असल्याचा आरोप जुन्या रहिवाशांनी केला आहे.
0 Comments