अमिताभपासून शिकण्यासारख्या लहान मोठ्या अनेक गोष्टी आहेत. माणूस उगाच ‘उंची’वर पोहचत नाही आणि टिच्चून टिकून राहत नाही. अशीच एक जया बच्चनसोबतची गोष्ट, अनेक अडथळे, आव्हाने, वादळे येऊनही केलेला पन्नास वर्षांचा सुखाचा संसार असाच सकारात्मक दृष्टिकोनातून पुढे सुरु आहे. काॅन्ट्रॅक्ट मॅरेज, विवाहपूर्व तर कुठे विवाहबाह्य संबंध, वेगळं राहून संसार, घटस्फोट, दुसरं (कदाचित तिसरंही) लग्न अशा गोष्टी रुजलेल्या काळात चक्क ‘एका लग्नाची पन्नाशी’ ही गोष्ट फारच एक्स्युझिव्हजच. अमिताभ बच्चन व जया भादुरी ३ जून १९७३ रोजी अगदी साध्या पध्दतीने विवाहबद्ध झाले. मला आठवतय, आमच्या घरी येत असलेल्या लोकसत्ता दैनिकात या लग्नाच्या बातमीत म्हटलं होते, ह्रषिकेश मुखर्जी दिग्दर्शित ‘अभिमान’चे शूटिंग संपल्यावर हा विवाह झाला. (‘अभिमान’ त्यानंतर २७ जुलै १९७३ रोजी प्रदर्शित झाला.)
तो काळ तसा अरेंज मॅरेजचा असला तरी फिल्मवाल्यांमध्ये लव्ह मॅरेज होत, आणि म्हणूनच ‘त्यांचं कसं जमलं’ याची विशेष उत्सुकता असे. या दोघांपैकी जया भादुरीचे करियर व्यवस्थित रुळत होते तर अमिताभचे पिक्चर रिलीज होताच फ्लाॅप होत होते. पण त्याचा यांच्या व्यक्तिगत नात्यावर परिणाम होत नव्हता याचाच अर्थ त्यांना एकमेकांबद्दल असलेली ओढ खरी होती. दोघे पहिल्यांदा भेटले कुठे, कधी आणि कसे? जयाजींनी एका मुलाखतीत म्हटलयं, ‘सात हिन्दुस्तानी’ हा आपला पहिला चित्रपट स्वीकारला तेव्हा त्याचे दिग्दर्शक के. ए. अब्बास यांच्यासोबत अमिताभ पुणे शहरातील चित्रपट आणि दूरदर्शन अभिनय संस्थेत आला असता तेव्हा त्याचे गंभीर व्यक्तिमत्व आणि उंची पाहून त्या इम्प्रेस झाल्या होत्या. पण तेव्हा एकमेकांशी साधी ओळख झाली नव्हती. ती ह्रषिकेश मुखर्जी यांनी ‘गुड्डी’च्या सेटवर करुन दिली. त्याच वेळेस ह्रषिकेश मुखर्जीनी ‘आनंद’मध्येही अमिताभला डाॅ. भास्करच्या भूमिकेसाठी निवडले आणि तो चित्रपट अगोदर प्रदर्शित होणार असल्याने ‘गुड्डी’त तो नवा चेहरा असणार नाही म्हणून त्याच्या जागी समित भांजा याला निवडले.
आपापल्या पध्दतीने अमिताभ व जया (Amitabh-Jaya) यांची करियर सुरु असताना ते बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘एक नजर’, प्रकाश वर्मा दिग्दर्शित ‘बन्सी बिरजू’त एकत्र काम करत असतानाच त्यांची मने जुळत गेली. ती यशस्वी होत होती, तो यशासाठी धडपडत होता. हे दोन्ही आणि इतर अनेक चित्रपट फ्लाॅप. अशातच प्रकाश मेहरा दिग्दर्शित ‘जंजीर’ (रिलीज ११ मे १९७३) मध्ये ते योगायोगानेच पुन्हा एकत्र आले. (मेहरांच्या ‘समाधी’त जया भादुरी डबल रोलमधील धर्मेंद्रची एक नायिका साकारत असतानाच जयानेच अमिताभच्या नावाचा मेहरांकडे आग्रह धरल्याची कुजबूज झाली.)
असं सारखं एकत्र आल्याने एकमेकांच्या सहवास व स्वभावाची सवय वाढते. ‘जंजीर’ पूर्ण होत असताना तो ट्रेण्ड सेटर ठरेल, अमिताभला ॲन्ग्री यंग मॅनची इमेज देईल, एक वादळ निर्माण होईल असं कोणालाही (खऱ्या आणि फिल्मी ज्योतिषालाही) वाटलं नव्हतं. म्हणून तर पिक्चर रिलीज झाल्यावर आणि समजा हिट झालाच तर आपण काही मित्रांसह लंडनला फिरायला जाऊ असे अमिताभ व जयाने ठरवले. असं सगळं घडत असतानाच जयाने आपल्या माता पित्यांना अमिताभशी आपल्या वाढलेल्या नात्याची कल्पना दिली. अमिताभने आपले पिता हरिवंशराय बच्चन यांना या पिकनिकची कल्पना देताच त्यांनी सांगितले, असं तुम्ही कसल्याही नात्याशिवाय पिकनिकला जाण्यापेक्षा तू जयाशी लग्न कर आणि पती पत्नी म्हणून लंडनला जा. सगळं कसं अचानक घडलं. पण चांगलंच घडलं. ‘जंजीर’ ही सुपर हिट ठरल्याने अमिताभ स्टार झाला. सिनेमाच्या जगात ‘यश हेच चलनी नाणे’ असल्याने ते नसेल तर ‘स्टोरी’ पुढे जात नाही. अशातच ‘अभिमान’ प्रदर्शित झाला, चिकित्सक रसिकांना आवडला.
पन्नास वर्षांचा यशस्वी संसार छान चाललाय ही यात मोठीच मिळकत. दोन्ही मुलांची (अभिषेक व श्वेता) लग्न झाली. सून आली, जावई आला. नातवंडे आली. या प्रवासात या नात्यात जास्त कसोटी कोणाची लागली? सगळचं काही सोपे, सरळ रेषेत जात नसतेच. स्पीड ब्रेकर येतातच. अमिताभने एबी, बीग बी, मिलिनियर स्टार, वन मॅन इंडस्ट्री असा केलेला ‘उंची’ प्रवास जयाजींना सुखावणाराच. परापरावादी भारतीय स्त्रीयांना आपल्या पतीच्या यशात प्रचंड आनंद मिळतोच. तीच आपली संस्कृती, परंपरा. पण या प्रवासात पतीचे पाऊल कुठे घसरले, त्याने ‘रेखा’ ओलांडली तर पत्नी कसे सहन करणार? एकिकडे आदर्श सासू सासरे, दुसरीकडे मुलांच्या पालनपोषणाला वेळ द्यावा म्हणून चित्रपटात काम करणे थांबवलयं. अशात पतीने बहुचर्चित ( की वादग्रस्त?) अभिनेत्री रेखाशी नाते जुळवावे? तिच्यात गुंतत जावे? सुपर स्टारच्या पत्नीच्या नशिबी असं येणे स्वाभाविक म्हणायचे का? दिग्दर्शक यश चोप्रा यांनी ‘सिलसिला’ ( १९८१) ची घोषणा केली आणि हा चित्रपट बीग बी, जया आणि रेखा यांच्या रियल (काॅन्ट्रोव्हर्सियल) स्टोरीवर आहे, असं गरमागरम, खमंग, चविष्ट गाॅसिप्स पिकले की, या चित्रपटाबाबत रसिकांच्या मनात वेगळीच इमेज तयार होत गेली. गाॅसिप्स मॅगझिनने हे सगळं घडवलं होतं आणि याचा व्हायचा तोच दुष्परिणाम झाला. पिक्चरची थीम तशी नव्हती ( बी. आर. चोप्रा दिग्दर्शित ‘गुमराह’ची आठवण करुन देणारी होती.) हा चित्रपट फ्लाॅप आहे असं म्हटलं जात असलं तरी ऑपेरा हाऊस थिएटरमध्ये ‘ज्युबिली हिट’ मुक्काम केला.
अमिताभ-जयाच्या पन्नास वर्षांच्या संसारातील हा ‘तिसरा कोन’ आपलं अस्तित्व कायमच अधोरेखित करणारा. कालांतराने जया बच्चन व रेखा दोघीही राज्यसभेत खासदार झाल्या, काही इव्हेन्टसमध्ये एकत्र दिसू लागल्या (गौतम राजाध्यक्षच्या ‘चेहरे’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातील त्यांचे भेटणे म्हणून तर गाजले.) हे होत असतानाच आमच्या दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्या बंगलोर येथील ‘कुली’ (रिलीज १९८३) च्या मारहाण दृश्याच्या शूटिंगमध्ये पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात (खरं तर अभिनयात) अमिताभच्या पोटात टेबलाचा तुकडा घुसला आणि गंभीर आजार उदभवला, तणावाची स्थिती निर्माण झाली. यात सर्वात मोठा आधार कुटुंब असते. ती जबाबदारी जयाजींनी उत्तम सांभाळली.
======
======
अमिताभने लोकसभा खासदारीचा अनुभव घेतला आणि बोफोर्स प्रकरणात नाव घेतले गेल्याने त्या पदाचा राजीनामा दिला. त्या दिवसांत अमिताभवर मिडियातून बरीच टीका होत होती, राजकीय आरोप होत होते. त्याचे चित्रपटही चालत नव्हते. या अवघड काळात पत्नीची साथ खूपच महत्वाची गोष्ट असते. अमिताभने जगभरात इव्हेन्टसमध्ये गाणे, नाचणे सुरु केले आणि मेरे अंगने मे… गाताना जयाला जोडीला घेतो याचे किस्से गाजले. भारतीय चित्रपटसृष्टीच्या पन्नासपेक्षा जास्त वर्ष कालखंडाचा अमिताभ बच्चन साथीदार, साक्षीदार, भागीदार आहे आणि या सगळ्यात त्याच्या पत्नीची त्याला सतत साथ आहे. एबीसीएलने मोठाच आर्थिक फटका खाल्ला, अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती’ने छोट्या पडद्यावर आला यात पाठीशी पत्नी असणे स्वाभाविक होतेच.
आज समाजात ‘विवाह संस्थे’पुढे काही आव्हाने निर्माण झाली आहेत. विवाहबाह्य संबंधाचे प्रमाण वाढलयं. घटस्फोटचा धक्का बोथट होत चाललाय. अशा परिस्थितीत एक सेलिब्रिटीज दाम्पत्य आपल्या लग्नाचा सुवर्ण महोत्सव साजरा करतेय याबाबत खूप खूप अभिनंदन. एकूणच समाजाने यांचा आदर्श आवर्जून ठेवावा. सुखी आयुष्याचा जणू तो एक मंत्र आहे. हा ट्रेलर वाटावा अशी व इतकी या ‘बच्चन पती पत्नी व कुटुंबाची स्टोरी’ बहुरंगी, बहुढंगी आहे.
0 Comments