राज्यभरातील प्राथमिक शिक्षक उद्या आंदोलनासाठी रजेवर… शाळा बंद राहणार?
कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यभरातील शिक्षक आज (२५ सप्टेंबर) रजा घेऊन आंदोलन करणार आहेत.
प्रतिनिधी
पुणे : कमी पटसंख्येच्या शाळांमध्ये शिक्षकांची कंत्राटी नियुक्ती, विद्यार्थ्यांना गणवेश न मिळणे, अध्यापन सोडून करावी लागणारी प्रशासकीय कामे अशा विविध मुद्द्यांवर राज्यभरातील शिक्षक आज (२५ सप्टेंबर) रजा घेऊन आंदोलन करणार आहेत. त्या अंतर्गत शिक्षक संघटनातर्फे राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे काही ठिकाणी शाळा बंद राहण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या विविध निर्णयांमुळे राज्यातील शालेय शिक्षणावर विपरित परिणाम होणार असल्याची शिक्षक संघटनांची भूमिका आहे. त्यामुळे शिक्षण विभागाच्या निर्णयांविरोधात प्राथमिक शिक्षकांची काही दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली. त्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचा सहभाग असलेले व्हॉट्सॲप समूह सोडणे, काळी फीत लावून काम करणे अशाप्रकारे विरोध दर्शवण्यात आला. त्यानंतर आता रजा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे.
आणखी वाचा-डंपरच्या धडकेत संगणक अभियंता तरुणाचा मृत्यू, नगर रस्त्यावर अपघात; डंपरचालक पसार
कमी पटाच्या शाळांवर तात्पुरत्या शिक्षकांची नियुक्ती, पुढे त्या शिक्षकालाही काढून टाकल्यास विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार आहे. शाळा सुरू होऊन तीन महिन्यांनंतरही कित्येक विद्यार्थी गणवेशाविना आहेत. मिळालेले गणवेश विद्यार्थ्यांच्या मापाचे नाहीत, अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला बाके नाहीत, काही ठिकाणी पुस्तकेही पोहोचलेली नाहीत, शाळांच्या इमारतीची दुरवस्था आहे. शाळेत पोषण आहारात रोज वेगवेगळे पदार्थ द्यायला सांगून त्यासाठी आवश्यक अनुदान दिले जात नाही. शिक्षकांना शिकवायची इच्छा असताना कागदपत्रे तयार करणे, ऑनलाइन बैठका, सातत्याने माहिती पाठवणे, उपक्रम करण्यात वेळ जातो. त्यामुळे अध्यापनासाठी पुरेसा वेळ देता येत नाही. अशा सर्व अडचणी सोडवून विद्यार्थ्यांना पुरेशा सुविधा, शिक्षकांना वेळ मिळण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांकडून आंदोलन करण्यात येणार आहे.
आणखी वाचा-पुणे : रुग्णालयात सौर उर्जा यंत्रणा बसविण्याच्या आमिषाने डॉक्टरची फसवणूक
दरम्यान, शिक्षक संघटनांच्या मागण्या विचारात घेऊन शासनाने बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे प्राथमिक शिक्षकांनी रजा घेऊन आंदोलन करू नये असे आवाहन आहे, असे प्राथमिक शिक्षक संचालक शरद गोसावी यांनी सांगितले.
साभार - लोकसत्ता
0 Comments