टावर आहे नावाला रेंज नाही गावाला! नेटवर्क अभावी ग्राहक त्रस्त
दरारा 24 तास न्युज नेटवर्क
पोंभुर्णा: मागील अनेक महिन्यांपासून तालुक्यातील अनेक गावात कोणत्याही कंपन्यांचे नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने मोबाईल धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्क मिळविण्यासाठी नागरिक आपला मोबाईल नंबर इतरत्र पोर्ट करत आहे परंतु ज्या कंपनीकडे नंबर पोर्ट केलाय त्या देखील मोबाईल कंपन्यांचा नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक, व्यापारी व विद्यार्थी मेटाकुटीला आले आहेत.
संबंधित कंपन्यांनी मोबाईल नेटवर्क मधील तांत्रिक बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करून चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून द्यावी अशी आग्रही मागणी जुनगाव, देवाडा बुज, पिपरी देशपांडे, दिघोरी,नवेगाव मोरे, व अनेक गावच्या नागरिकांनी केली आहे.
देवा डाबुज येथे टावर उपलब्ध आहे मात्र या टावर पासून गावातच कव्हरेज रेंज मिळत नसल्याने आजूबाजूच्या गावात त्याचा अजिबात थांगपताच नाही. टावर उभारल्यापासून काही महिने जिओने चांगली सर्व्हिस दिली. मात्र अनेक महिन्यापासून हे टावर बंद आहे की चालू हे कळायला मार्ग नसल्याने ग्राहक वर्ग व सर्व स्तरातील नागरिक हैराण झाले आहेत. मोबाईल ग्राहकांना चांगली सुविधा मिळावी या हेतूने ठीक ठिकाणी लाखो रुपये खर्च करून मोबाईल टावर्स उभारण्यात आले. ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, बँका, पतसंस्था,आरोग्य केंद्र, पोस्ट ऑफिस,व पुरवठा विभागाने स्वस्त धान्य वाटप ऑनलाईन केले आहे. मात्र मोबाईल नेटवर्क तसेच इंटरनेट अभावी सर्वांचेच हाल होत आहेत. त्यातल्या त्यात महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी तसेच पीक पाहणणी या सर्व गोष्टींसाठी मोबाईल नेटवर्कची आवश्यकता असते. लोकांना रिचार्ज मारू नये सेवा मिळत नसल्याने आर्थिक भार सोसावा लागत असून गैरसोय लोकांच्या जणू अंगवळणीच पडली आहे. त्यामुळे सहाजिकच "टावर आहे नावाला रेंज नाही गावाला'अशी म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.
==============.====.
मोबाईल कंपन्यांच्या या व्यवस्थेमध्ये गडगंज पगारावर अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. परंतु हे अधिकारी कर्मचारी ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या सुविधेकडे लक्ष देत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे सध्या तरी मोबाईल टावर शोभेची वस्तू बनले आहेत. आज घडीला मोबाईल कंपन्यांच्या भरवशावर स्थानिक बँका, सरकारी कार्यालये, हजारो, लाखोच्या संख्येने असलेले मोबाईल धारक अवलंबून आहेत. परंतु याच मोबाईल कंपन्यांकडून नेटवर्क व्यवस्थित मिळत नसल्याने अनेक वेळा बँकांमधील व्यवहाराचा खेळ खंडोबा झालेला आहे. याबाबत संबंधित मोबाईल कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकारी यांनी तथा जनप्रतिनिधींनी गांभीर्याने दखल घेऊन ग्राहकांना आवश्यक व व्यवस्थित सुविधा पुरवावी, यासाठी तातडीने उपाययोजना करून ग्राहकांना सुविधा पुरवावी.
- संतोष सिंह रावत काँग्रेस नेते, चंद्रपूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष, व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रपूर
-
0 Comments