पोंभुर्णा: तालुका प्रतिनिधी
पोंभुर्णा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मौजा जुनगाव येथे आज गुरुवारी सकाळी दोन वाघांचे शेतकऱ्यांना दर्शन झाले असून शेतकरी प्रचंड भयभीत झाले आहेत.
सातत्याने जूनगाव, देवाळा बुद्रुक, नांदगाव, फुटाणा इत्यादी गावात वाघाचे दर्शन होत आहे. मात्र वन विभागाला याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे आतापर्यंतच्या अनुभवावरून जाणवत आहे.
वनविभाग वाघांचा बंदोबस्त करून त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम करणे आवश्यक आहे.मात्र तसे न करता वन विभाग आपल्याच गुरमीत वावरत आहे.
आज गुरुवार दिनांक 8 मे रोजी किशोर शिवराम पाल हे आपल्या पत्नी सोबत शेतात काम करत असताना सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन वाघ दिसून आले. एक मोठा तर दुसरा छोटा असल्याचे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला अनेकदा राजकीय कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते यांनी आंदोलनाचा सुद्धा इशारा दिला आहे. परंतु वन विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष राहुल भाऊ पाल यांनी यापूर्वीच वाघाचा बंदोबस्त करा अन्यथा आंदोलन करू असा इशारा वन विभागाला दिला आहे. तरीसुद्धा वनविभाग कुठलीच कारवाई व उपाय योजना करत नसल्यामुळें वाघ सैरावैरा फिरत आहेत. जीवित हानी झाल्यास वन विभाग जबाबदार असेल असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.
0 Comments