Advertisement

“EVM सुरक्षेबाबत वाढलेली शंका; बल्लारपूर काँग्रेसची स्ट्राँग रूममध्ये जॅमरची मागणी”

“EVM सुरक्षेबाबत वाढलेली शंका; बल्लारपूर काँग्रेसची स्ट्राँग रूममध्ये जॅमरची मागणी”




बल्लारपूर, ता. प्र.: प्रशांत रणदिवे...
बल्लारपूर शहर काँग्रेस कमिटीने स्ट्राँगरूम परिसराची सुरक्षा अधिक बळकट करण्यासाठी जॅमर बसवण्याची मागणी सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल वाघ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. काँग्रेस शहराध्यक्ष देवेंद्र आर्य यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान संपन्न झाले होते. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ३ डिसेंबरला मतमोजणी होणार होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेदरम्यान घेतलेल्या निर्णयानुसार मतमोजणीची तारीख पुढे ढकलत २१ डिसेंबर निश्चित करण्यात आली आहे.

सध्या नागरिकांच्या मनात EVM हॅकिंग, मतचोरी, तसेच मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे काँग्रेसने लक्षात आणून दिले.
EVM हे इलेक्ट्रॉनिक उपकरण असल्याने आणि त्यामध्ये बॅटरी जोडलेली असल्याने मोबाइल इंटरनेट किंवा सॅटेलाइटमार्फत हस्तक्षेप होऊ शकतो, अशी भीती जनतेत व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर स्ट्राँगरूमच्या परिसरात मोबाइल नेटवर्क व इंटरनेट सिग्नल पूर्णपणे बंद ठेवण्यासाठी जॅमर बसवणे अत्यावश्यक असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले.

सहाय्यक निवडणूक अधिकारी विशाल वाघ यांनी हे निवेदन स्वीकारले असून सदर मागणीबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन घेण्याची ग्वाही त्यांनी दिली.

निवेदन देताना माजी नगराध्यक्ष छाया मडावी, माजी नगरसेवक भास्कर माकोडे, इस्माईल ढाकवाला यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

— दरारा 24 तास न्यूज नेटवर्क, बल्लारपूर
प्रतिनिधी : प्रशांत रणदिवे



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या