Advertisement

पक्षी सप्ताहातच पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार — सावली वनपरिक्षेत्राची धडक कारवाई, चार शिकारी अटक

 


पक्षी सप्ताहातच पक्ष्यांची मोठ्या प्रमाणावर शिकार — सावली वनपरिक्षेत्राची धडक कारवाई, चार शिकारी अटक

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क | सावली (जि. चंद्रपूर)

वन्यजीव आणि पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी दरवर्षी साजरा होणाऱ्या “पक्षी सप्ताह” दरम्यानच पक्ष्यांची शिकार करणाऱ्या चार आरोपींना सावली वनपरिक्षेत्राच्या पथकाने रंगेहात पकडून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त करण्याची धडक कारवाई केली आहे. ही कारवाई शुक्रवारी (दि. 07 नोव्हेंबर 2025) पहाटेच्या सुमारास मौजा उमरी (नियतक्षेत्र सिर्सी, उपवनक्षेत्र व्याहाड) येथील उमरी तलाव परिसरात करण्यात आली.


🦜 कारवाईचे सविस्तर वृत्त :

वन्यजीव सप्ताहानिमित्त सावली वनपरिक्षेत्रातील स्थानिक वनकर्मचारी पक्षी निरीक्षण करीत असताना, काही व्यक्ती रेशाळ कंठाची भिंगरी (Streak Throated Swallow) या दुर्मीळ पक्ष्यांची शिकार करत असल्याचे निदर्शनास आले. मिळालेल्या माहितीवरून वनपथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत चार आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले.


अटक आरोपी :

  1. लोमेश धोंडू गेडाम (वय 34)
  2. प्रताप बालाजी जराते (वय 45)
  3. अरविंद धोंडू गेडाम (वय 33)
  4. मुखरू सखाराम मेश्राम (वय 65)
    — सर्व रा. पारडी, ता. व जि. गडचिरोली

जप्त मुद्देमाल :

  • शिकारीसाठी वापरलेल्या जाळ्या – 08 नग
  • थैली – 05 नग, नायलॉन दोरीचे 09 बंडल
  • बांबू काठ्या – 16 नग, लाकडी खुंटी – 08 नग
  • शिकारीतील मृत पक्षी – 225 नग
  • मोटारसायकल – 2 नग (CB Shine MH-33/X0113 व Bajaj Discover MH-33/L-3165)

या सर्व मुद्देमालाची किंमत हजारो रुपयांत असून, आरोपींविरुद्ध वन्यजीव (संरक्षण) अधिनियम 1972 मधील कलम 9, 39, 49, 50, 51 अन्वये गुन्हा क्रमांक 204/232851, 4/232851/2025 नोंदविण्यात आला आहे.

अधिकारी व कर्मचारी यांची संयुक्त कारवाई :

ही कारवाई श्री. विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. त्यांना श्री. अनंत राखुंडे (वनक्षेत्र सहायक, व्याहाड), श्री. महादेव मुंडे (वनरक्षक, सिर्सी), भोलेश्वर सोनेकर (वनरक्षक, सामदा), एकनाथ खुडे (वनरक्षक, गायडोंगरी), आर. एस. डांगे (वनरक्षक, उपरी), तसेच स्थानिक पीआरटी चमू आणि बिट मदतनीस यांचे सहकार्य लाभले.

वरिष्ठांचे मार्गदर्शन :

पुढील तपास श्री. राजन तलमले, विभागीय वनाधिकारी, चंद्रपूर आणि श्री. विकास तरसे, सहाय्यक वनसंरक्षक, चंद्रपूर वनविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विनोद धुर्वे, वनपरिक्षेत्र अधिकारी, सावली यांचेकडून सुरू आहे.


🌿 संदेश :

वनविभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, पक्ष्यांची शिकार करणे हा गंभीर गुन्हा आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियमानुसार अशा गुन्ह्यांना कडक शिक्षा व दंडाची तरतूद आहे. निसर्गाचे संतुलन टिकवण्यासाठी आणि पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी सर्वांनी जागरूक राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या