🟢 धान खरेदी नोंदणीसाठी बेंबाळ ग्रामपंचायतीत आयडी देण्याची मागणी-
खासदार प्रतिभाताई धानोरकर यांचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी निवेदन
मुल, प्रतिनिधी :
सध्या शासनाच्या आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना नोंदणीसाठी थेट कृषी उत्पन्न बाजार समिती, मुल येथे येणे बंधनकारक आहे. मात्र तालुक्यात केवळ एकाच ठिकाणी नोंदणी होत असल्याने दररोज शेकडो शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असून, त्याचा फटका थेट शेतकऱ्यांना बसत आहे.
धान पिकाच्या हंगामात शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून नोंदणीसाठी दूरवर ये-जा करावी लागत आहे. विशेषतः मुल तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या मौजा बेंबाळ येथील शेतकऱ्यांना बेंबाळ ते मुल हे अंतर अधिक असल्याने वारंवार बाजार समितीत येणे गैरसोयीचे ठरत आहे. अनेकदा दिवसभर रांगेत उभे राहूनही गर्दीमुळे नोंदणी न होताच शेतकऱ्यांना परत जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुलभ व्हावी, वेळ वाचावा तसेच अनावश्यक आर्थिक खर्च टळावा, यासाठी बाजार समितीचा शेतकरी नोंदणी आयडी ग्रामपंचायत बेंबाळ येथे उपलब्ध करून देण्यात यावा, अशी ठोस मागणी करण्यात आली आहे.
या संदर्भात खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी जिल्हाधिकारी, चंद्रपूर यांच्याकडे लेखी पत्राद्वारे मागणी सादर केली आहे. बेंबाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन ही मागणी करण्यात आली असून, ग्रामपंचायत बेंबाळ येथेच नोंदणी सुरू झाल्यास परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
या मागणीसाठी ग्रामपंचायत बेंबाळचे सरपंच चांगदेव केमेकार तसेच उपसरपंच देवाजी ध्यानबोईवार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती आहे. प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन ग्रामपंचायत पातळीवर नोंदणी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे.
— दरारा 24 तास न्यूज नेटवर्क




0 टिप्पण्या
Thanks for reading