उमेदवाराच्या भावावर वीट फेकून हल्ला!
गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीनंतर तणाव ; निषेध रॅली, बाजारपेठ बंद
चंद्रपूर : गडचांदूर नगरपरिषद निवडणुकीनंतर राजकीय वातावरण तापले. मतदान संपल्यानंतर झालेल्या किरकोळ वादातून परिस्थिती चिघळली आणि भाजपचे उमेदवार सूरज पांडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे उमेदवार अरुण निमजे यांचे भाऊ प्रकाश निमजे यांच्यावर वीट फेकून हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. या हल्ल्यात प्रकाश निमजे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी संताप व्यक्त करत "सूरज पांडे याला तात्काळ अटक करा" या मागणीसाठी निषेध रॅली काढली. दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने बाजारपेठ बंद ठेवली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तैनाती वाढवली असून दोन्ही पक्षांच्या समर्थकांमध्ये पुढील वाद होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.
स्थानिकांकडून माहिती मिळाली की, निकालाच्या अंदाजावरून वाद सुरू झाला आणि तो तणावात परिवर्तित झाला. या प्रकरणी पोलिसांकडून विविध कोनातून तपास सुरू असून आरोपीस अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
या घटनेमुळे निवडणुकीनंतरचे वातावरण अधिक तापले असून नागरिकांनी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
— दरारा 24 तास न्यूज नेटवर्क




0 टिप्पण्या
Thanks for reading