Advertisement

चामोर्शी तालुक्यात रब्बी धान व मक्का खरेदीसाठी सातबारा नोंदणी केंद्र सुरू, 30 एप्रिलपर्यंत नोंदणीची अंतिम मुदत



चामोर्शी, गडचिरोली: शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगाम 2025-26 करिता मक्का व धान खरेदीसाठी चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ मर्यादित, चामोर्शी र.नं. 626 अंतर्गत सातबारा नोंदणी केंद्र आज, 20 एप्रिल 2026, सोमवारपासून सुरू करण्यात आले आहेत. संस्थेचे अध्यक्ष मा. अतुलभाऊ गण्यारपवार यांनी ही माहिती दिली.

हमीभाव व अंतिम मुदत

जिल्हा पणन अधिकारी, गडचिरोली यांच्या सूचनेनुसार रब्बी हंगाम 2025-26 साठी शासनाने मक्क्याला 2400 रुपये प्रति क्विंटल व धानाला (सर्वसाधारण) 2369 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी 30 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12:00 वाजेपर्यंत आपल्या सातबाऱ्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे. 

नोंदणीची वेळ व ठिकाणे

शेतकऱ्यांनी सकाळी 11:00 ते दुपारी 4:00 या वेळेत खालील खरेदी केंद्रांवर आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून नोंदणी करावी.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

मक्का/धान उत्पादन घेतल्याची नोंद असलेला स्वतःच्या नावावरील सातबारा व गाव नमुना 8 (अ)

आधार कार्ड ची झेरॉक्स

सुस्पष्ट दिसेल अशी बँक पासबुक ची झेरॉक्स

संमतीपत्र (एकापेक्षा जास्त व्यक्तींचे नाव असल्यास)

जातीचा स्व-घोषणापत्र

चालू मोबाईल क्रमांक

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना

ई-पीक पाहणी अनिवार्य: सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी अ‍ॅपमध्ये स्वतःच्या शेतमालाची नोंद करूनच सन 2025-26 च्या चालू सत्रातील सातबारा दिलेल्या ठिकाणी जमा करावा.

बँक खाते व मोबाईल तपासणी: नोंदणी करताना स्वतःचा चालू मोबाईल नंबर व सुरू असलेल्या बँक खात्याची पासबुक झेरॉक्स देण्यात यावी. मक्का व धान खरेदी सुरू झाल्यानंतर दैनिक पत्रकाद्वारे माहिती देण्यात येईल व शेतकऱ्यांना जिल्हा पणन अधिकारी व शासनाच्या आदेशानुसार मोबाईलवर मेसेजद्वारे कळवण्यात येईल.

मक्क्याची गुणवत्ता: धान व मक्का खरेदी केंद्रावर घेऊन येताना मक्का पूर्णपणे सुकलेला व स्वच्छ असावा. बुरशीयुक्त, काळा, कोंद्या असलेला, पांढरा पडलेला, किड लागलेला मक्का खरेदी करण्यात येणार नाही.


शेतकऱ्यांनी शासनाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत नोंदणी करावी, असे आवाहन चामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अतुलभाऊ गण्यारपवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या