Advertisement

⚡ विजेचा करंट लागून तीन म्हशींचा मृत्यू; देवाडा बुज येथे धक्कादायक घटना

 


⚡ विजेचा करंट लागून तीन म्हशींचा मृत्यू; देवाडा बुज येथे धक्कादायक घटना

📍 पोंभुर्णा तालुका प्रतिनिधी | दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा बुज येथे विजेच्या जिवंत प्रवाहामुळे तीन म्हशींचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक घटना आज सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित शेतकऱ्याच्या शेतात विजेचा प्रवाह सुरू असल्याने शेतात चरायला गेलेल्या तीन म्हशींना करंट लागला आणि त्या जागीच मृत झाल्या. या म्हशी जूनगाव येथील शेतकऱ्यांच्या असल्याचे समजते. मृत म्हशींची किंमत प्रत्येकी सुमारे ७० ते ८० हजार रुपये असल्याचा अंदाज असून एकूण मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी महावितरण अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र संबंधित अभियंता कंदी गुरुवार यांनी रात्री उशिरा माहिती मिळाल्याचे सांगत पंचनामा उद्या केला जाईल असे स्पष्ट केले. त्यामुळे या मृत म्हशी रात्रभर शेतातच पडून राहणार असल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

गावकऱ्यांच्या मते, महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्घटना घडली असून वेळेत दुरुस्ती व देखरेख झाली असती तर ही घटना टाळता आली असती. तसेच शेतकरी व शेतमजुरांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

या घटनेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये विलास शंकर जवादे, फकीरा गोहने आणि बाबुराव भोयर यांचा समावेश आहे.

दरम्यान, माजी सरपंच तथा शिवसेना उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांनी प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेऊन संबंधितांवर कडक कारवाई करावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे.

👉 ग्रामस्थांची प्रमुख मागणी:

  • घटनेचा तात्काळ पंचनामा करावा
  • जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
  • शेतकऱ्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी
  • विजेच्या लाईनची तातडीने तपासणी व दुरुस्ती करावी

ही घटना पुन्हा एकदा ग्रामीण भागातील विजेच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या