Advertisement

कोकळगाव येथे अवैध वाळू उपसा सुरूच; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी


 

कोकळगाव येथे अवैध वाळू उपसा सुरूच; जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

लातूर | प्रतिनिधी
निलंगा तालुक्यातील कोकळगाव परिसरातील तेरणा नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे.

संघटनेच्या निवेदनानुसार, नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध वाळू उपशामुळे शासनाच्या महसुलाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असून पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी ६ एप्रिल २०२६ रोजी प्रशासनाला निवेदन देण्यात आले होते. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, काही महसूल अधिकाऱ्यांकडून नागरिकांकडून विविध कामांसाठी मोठ्या रकमेची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी संघटनेने केल्या आहेत. काही स्थानिक अधिकारी व राजकीय पाठबळामुळे परिस्थिती गंभीर बनल्याचाही आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

प्रशासनाने येत्या १० मे २०२६ पर्यंत सकारात्मक निर्णय न घेतल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासनच जबाबदार राहील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.


या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय आदिवासी वाल्मिकी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. विशाल वसंतराव सूर्यवंशी यांनी केली आहे.

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या