पोंभुर्णा प्रतिनिधी :
तालुक्यातील बोर्डा झुल्लुरवार येथे अवैध मुरूम उत्खननाचा प्रकार दिवसेंदिवस गंभीर होत असून विशेष म्हणजे शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीच मोठ्या प्रमाणावर उत्खनन सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकारी व कर्मचारी सुट्टीमुळे तपासणीसाठी फिरू शकत नाहीत, याचाच फायदा घेत संबंधितांकडून बेधडक उत्खनन सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, शनिवार-रविवारी तब्बल दहा ते बारा ट्रॅक्टरद्वारे मुरूमाची वाहतूक सुरू असते. दिवसरात्र सुरू असलेल्या या प्रकारामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बोर्डा झुल्लुरवार येथील भूमापन क्रमांक 198 मध्ये मुरूम उत्खननासाठी लीज मंजूर असली, तरी परवानगीच्या अटींचा भंग करून मोठ्या प्रमाणावर अतिरिक्त उत्खनन केले जात असल्याचा आरोप होत आहे. सात ते आठ फूट खोल खोदकाम करून नैसर्गिक संपत्तीची लूट सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी व संबंधित कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी, मुख्यत्वे करून तहसीलदार यांची भूमिका अत्यंत संशयास्पद आहे त्यामुळे त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे उपतालुका प्रमुख जीवनदास गेडाम यांनी केली आहे.
#बोर्डाझुल्लुरवार #पोंभुर्णा #अवैधउत्खनन #मुरूममाफिया #चंद्रपूर #महसूलविभाग #जीवनदासगेडाम #शिवसेना #BreakingNews #MaharashtraNews




0 टिप्पण्या
Thanks for reading