पोंभूर्णा (जि. चंद्रपूर),
तालुक्यातील मौजा बोर्डा झुल्लूरवार येथे सर्व्हे क्रमांक १९८ मधील शेतजमिनीवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या मुरूम उत्खननामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. शासनाच्या नियमांना बगल देत अंदाजे १० ते ११ फूट खोल खड्डे करून मुरूम काढला जात असल्याचा गंभीर आरोप करत शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.
माया रविंद्र सरपे आणि दिलीप नक्टू गद्देकार (रा. बोर्डा झुल्लूरवार, ता. पोंभूर्णा) यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे की, संबंधित कंत्राटदाराला उत्खननासाठी परवानगी असली तरी प्रत्यक्षात नियमांचे उल्लंघन करून मोठ्या प्रमाणावर मुरूम काढण्यात येत आहे. महसूल विभागाकडून या कामावर योग्य देखरेख नसल्याने परिस्थिती गंभीर झाली आहे.
तक्रारदारांच्या मते, त्यांच्या शेजारील सर्व्हे क्रमांक १९७ मधील शेती या उत्खननामुळे धोक्यात आली आहे. खोल खड्डे तयार झाल्याने पावसाचे पाणी साठण्याऐवजी खड्ड्यात झिरपून जाणार असून, त्यामुळे शेतात ओल टिकणार नाही. परिणामी भविष्यात पिके घेणे अशक्य होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित प्रकरणाची तात्काळ मोकाचौकशी करण्यात यावी,
नियमबाह्य मुरूम उत्खनन त्वरित बंद करण्यात यावे,
खड्डे भरून जमीन पूर्वस्थितीत आणावी,
परवानगी व प्रत्यक्ष उत्खननातील तफावत तपासून कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई करावी,
शेतकऱ्यांच्या जमिनीतील पाणी टिकून राहील याची हमी शासनाने द्यावी,
दोषींवर महसूली तसेच फौजदारी कारवाई करण्यात यावी.
शेतकऱ्यांनी या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी करत न्याय मिळवून देण्याची विनंती केली आहे. या तक्रारीच्या प्रती स्थानिक आमदार सुधीर मुनगंटीवार, जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी लघिमा तिवारी यांनाही देण्यात आल्या असून, प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
अनियमित व अवैध उत्खननामुळे शेती आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत असून, वेळेत कारवाई न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे प्रशासनाने तत्काळ हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणणे गरजेचे असल्याचे मत स्थानिकांकडून व्यक्त होत आहे.







0 टिप्पण्या
Thanks for reading