पोंभूर्णा प्रतिनिधी :
महाराष्ट्र शासनातर्फे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ (NMMS) मध्ये राष्ट्रमाता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय, देवाडाखुर्द येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील एकूण २७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये नंदिनी राकेश गोरंतवार, वंशीका मधुकर सातरे, निधी गुणवंत टेकाम, दिव्या विकास परचाके आणि स्वाती ऋषिदेव मोगंरकर यांचा समावेश आहे. यापैकी स्वाती ऋषिदेव मोगंरकर हिची राष्ट्रीय आर्थिक दुर्बल शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असून तिला इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंत दरवर्षी १२ हजार रुपये प्रमाणे शिष्यवृत्ती मिळणार आहे.
स्वातीच्या या उल्लेखनीय यशामुळे तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत असताना कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण अभ्यास आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यांच्या बळावर तिने हे यश मिळवले आहे. स्वातीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील तसेच विषय शिक्षक संजय नागुलवार यांना दिले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल राष्ट्रमाता ग्रामीण विकास शिक्षण प्रसारक मंडळ, देवाडाखुर्दचे अध्यक्ष आबाजी पा. बुरांडे, सचिव शंकरराव टिकले, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य दिलीप मॅकलवार, शिक्षकवृंद तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत असून विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेचीही यामुळे पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.
– दरारा 24 तास न्यूज नेटवर्क




0 टिप्पण्या
Thanks for reading