Advertisement

पोंभूर्णा बाजार समितीच्या तारण योजनेला मोठे यश; धानाला प्रतिक्विंटल ₹४,२६५ चा विक्रमी भाव

 पोंभूर्णा बाजार समितीच्या तारण योजनेला मोठे यश; धानाला प्रतिक्विंटल ₹४,२६५ चा विक्रमी भाव


जुनगाव | प्रतिनिधी

पोंभूर्णा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना यंदा धानाला विक्रमी दर मिळाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. योजनेअंतर्गत तारण ठेवलेल्या धानाच्या खुल्या लिलावात प्रतिक्विंटल ₹४,१२५ ते ₹४,२६५ असा दर मिळाला. हा दर त्या वेळच्या बाजारभावापेक्षा सुमारे ₹६०० ते ₹८०० अधिक असल्याने तारण योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

यावर्षी तारण योजनेत ६२ शेतकऱ्यांनी एकूण ३,०६७ क्विंटल धान तारण ठेवले होते. योजनेमुळे शेतकऱ्यांना धान तातडीने कमी दरात विकण्याची गरज भासली नाही. धान साठवून ठेवण्याची सुविधा मिळाल्याने योग्य वेळ साधून खुल्या लिलावाद्वारे विक्री करता आली आणि त्यातून अधिकचा दर मिळाला.

लिलावात फुटाणा येथील वासुदेव झुगाजी नागापुरे, दिघोरी येथील काशिनाथ नामदेव व्याहळकर आणि सोनापूर येथील मुरलीधर बाबाजी गौरकर यांच्या धानाला प्रतिक्विंटल ₹४,२६५ असा सर्वोच्च भाव मिळाला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या तारण योजनेबद्दल समाधान व्यक्त केले.

हंगामाच्या सुरुवातीला धानाला केवळ ₹२,५०० ते ₹२,८०० इतकाच दर मिळत असल्याने अनेक शेतकऱ्यांवर कमी भावात धान विकण्याची वेळ आली होती. मात्र तारण योजनेमुळे शेतकऱ्यांना धानाच्या अंदाजित किमतीच्या ७५ टक्के अग्रीम रकमेचा लाभ मिळाला. त्यामुळे आर्थिक गरजा भागविण्यास मदत झाली आणि बाजारभाव वाढेपर्यंत धान सुरक्षित ठेवणे शक्य झाले.

या लिलावात पोंभूर्णा, गोंडपिपरी, मूल, बल्लारपूर आणि गडचिरोली येथील व्यापाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याने स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. परिणामी शेतकऱ्यांच्या धानाला अपेक्षेपेक्षा अधिक दर मिळाला.

तारण योजनेचा लाभ घेतलेले शेतकरी वासुदेव नागापुरे यांनी बाजार समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करत, ही योजना शेतकऱ्यांसाठी आर्थिकदृष्ट्या दिलासादायक ठरल्याची भावना व्यक्त केली.

या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी बाजार समितीचे सभापती रवींद्र मरपल्लीवार, उपसभापती आशिष कावटवार, प्रभारी सचिव लिलाधर बुरांडे तसेच संचालक रवींद्र गेडाम, नैलेश चिंचोलकर, डॉ. निलेश पावडे, धनराज सातपुते, राकेश गव्हारे, वसंत पोटे, वासुदेव पाल, अशोक साखलवार, प्रवीण पिदुरकर, विलास मोगरकार, विनोद थेरे, प्रफुल्ल लांडे, विनायक बुरांडे, सुनील कटकमवार, भारती बदन आणि सुनंदा गोहणे यांनी विशेष पुढाकार घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या