कान्होली येथे देशी दारू जप्त; चामोर्शी पोलिसांची धडक कारवाई
गडचिरोली | वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क
तालुक्यातील कान्होली येथे राहत्या घरातून अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीवर चामोर्शी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत ११ हजार २०० रुपये किंमतीच्या देशी दारूच्या १४० निपा हस्तगत करण्यात आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, कान्होली गावात एका घरातून अवैधरित्या देशी दारूची विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती चामोर्शी पोलिसांना प्राप्त झाली होती. माहितीची खातरजमा केल्यानंतर पोलीस निरीक्षक डोंब यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले.
त्यानुसार पोलिसांनी जीवनदास नारायण शेंडे यांच्या घरावर छापा टाकला. घराची झडती घेतली असता, घराच्या सांधवाडीत पांढऱ्या रंगाच्या पिशवीत लपवून ठेवलेल्या देशी दारूच्या १४० निपा आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपी जीवनदास नारायण शेंडे यांच्याविरोधात संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक डोंब यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक गणेश जंगले तसेच पोलीस शिपाई लक्ष्मण तरंगे यांनी पार पाडली. पुढील तपास पोलीस शिपाई लक्ष्मण तरंगे करीत आहेत.




0 टिप्पण्या
Thanks for reading