पोंभुर्णा तालुक्यात शेताला भीषण आग; मका पीक, मोटार पाईप व शेती अवजारे जळून खाक
पोंभुर्णा तालुक्यातील मौजा ठाणेवासना येथे एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक लागलेल्या आगीत मोठे नुकसान झाले असून अंदाजे पाच एकरांवरील उभे मका पीक जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. दीपक विश्वनाथ पावडे, रा. चेक ठाणेवासना, ता. पोंभुर्णा यांच्या मालकीची शेती सर्वे नं. 100/4 मध्ये असून दिनांक 21 मे 2026 रोजी दुपारी सुमारे 3 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेतातील उभे मका पीक पूर्णतः जळून गेले.
या आगीत केवळ पीकच नाही तर शेतीसाठी वापरण्यात येणारे मोटार पाईप, विद्युत साहित्य तसेच शेती मशागतीची विविध अवजारे देखील जळून मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
घटनेनंतर शेतकरी श्री. दीपक पावडे यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी यांच्याकडे पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत व भरपाई मिळावी यासाठी निवेदन दिले आहे. त्यांनी अर्जासोबत 7/12 उतारा, आधार कार्ड, नुकसानग्रस्त शेतीचे फोटो व इतर आवश्यक कागदपत्रे सादर केली आहेत.
या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क




0 टिप्पण्या
Thanks for reading