जिवती तालुका ठरतोय बालविवाहाचा ‘हॉटस्पॉट’; अल्पवयीन मुलीचा विवाह रोखण्यात प्रशासनाला यश
वैनगंगा न्यूज लाईव्ह नेटवर्क | जिवती, चंद्रपूर
चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यात बालविवाहाच्या घटना सातत्याने समोर येत असून, प्रशासन आणि बाल संरक्षण यंत्रणेसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशातच चाईल्ड हेल्प लाईनच्या कंट्रोल रूमला प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जिल्हा चाईल्ड हेल्प लाईनच्या पथकाने तातडीने कारवाई करत एका अल्पवयीन बालिकेचा बालविवाह रोखण्यात यश मिळविले.
मिळालेल्या माहितीनुसार, जिवती तालुक्यातील एका गावात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून देण्याची तयारी सुरू होती. या माहितीची गंभीर दखल घेत जिल्हा चाईल्ड हेल्प लाईनचे पथक तत्काळ अॅक्शन मोडमध्ये आले. संबंधित बालिकेच्या वयाची कागदपत्रे तपासण्यात आली असता तिचे वय केवळ 17 वर्षे 9 महिने असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्रीमती मीनाक्षी भस्मे, बाल कल्याण समिती अध्यक्षा क्षमा बासारकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर आणि प्रकल्प समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशिका दिपाली मसराम व केस वर्कर अंकुश उराडे यांनी संबंधित गाव गाठले. ग्राम बाल संरक्षण समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या मदतीने बालिकेच्या कुटुंबाशी संपर्क साधण्यात आला.
यावेळी पालकांचे समुपदेशन करताना बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 अंतर्गत मुलीचे किमान वय 18 वर्षे आणि मुलाचे वय 21 वर्षे असणे बंधनकारक असल्याची माहिती देण्यात आली. बालविवाह हा केवळ कायद्याचा भंग नसून मुलांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचेही स्पष्ट करण्यात आले.
तसेच बालविवाह घडवून आणणारे, त्याला प्रोत्साहन देणारे किंवा परवानगी देणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई होऊ शकते, याची जाणीव करून देण्यात आली. संबंधित कायद्यानुसार दोषींना दोन वर्षांपर्यंत कारावास आणि ₹1 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो, असेही समजावण्यात आले.
सदर प्रकरणी संबंधित कुटुंबाला बाल कल्याण समिती, चंद्रपूर समोर उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी व्यापक समुपदेशन करण्यात आले.
या कारवाईदरम्यान ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर संदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा चाईल्ड हेल्प लाईनचे समुपदेशिका दिपाली मसराम व केस वर्कर अंकुश उराडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. बालविवाहासारख्या सामाजिक समस्येविरोधात प्रशासनाने घेतलेल्या या तत्पर भूमिकेचे सर्वत्र कौतुक होत आहे.





0 टिप्पण्या
Thanks for reading