Ticker

6/recent/ticker-posts

नागपूर मिहानमधील प्रस्तावित टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरातला स्थलांतरित करणे हा विदर्भावर अन्याय - राजु झोडे



चंद्रपूर:- वेदांता-फॉक्सकानच्या पाठोपाठ नागपुरातील मिहान मध्ये प्रस्तावित टाटा समूहाचा एअरबस प्रकल्प गुजरात मध्ये गेल्याच्या मुद्द्यावरून नागपूर विदर्भ कर्मभूमी असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी विदर्भावर घोर अन्याय केलेला आहे.टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प गुजरातला गेल्याने विदर्भाचे प्रचंड नुकसान होणार आहे. विदर्भातील तरुणांना नोकरी रोजगारासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद सारख्या मोठ्या शहरांची वाट धरावी लागणार आहे. ही सरकार व उपमुख्यमंत्री हे गुजरात समोर लोटांगण घालणारे आहेत अशी टिका देखिल उलगुलान संघटनेचे संस्थापक‌ तथा अध्यक्ष राजू झोडे यांनी आज बोलताना केली‌ आहे .
  भाजपा नेत्यांनी आजपर्यंत वेगळा विदर्भ आणि विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यावर आपल्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. सत्ता मुख्यमंत्रीपद, उपमुख्यमंत्री पद मिळाल्यावर मात्र त्यांना विदर्भाचा विसर पडलेला दिसत आहे. विदर्भाची जनतेची मते घेऊन विदर्भात येणारे प्रकल्प गुजरातला पाठवण्याचे षडयंत्र फडणविस करीत आहेत.फडणविसांसाठी विदर्भातील जनतेपेक्षा गुजरात महत्त्वाचा आहेत
.त्यामुळे त्यांनी पुढची निवडणूक गुजरातमधूनच लढवावी असा टोला सुध्दा राजू झोडे यांनी लगाविला आहे. फडणविस पाच वर्षें मुख्यमंत्री असतांना एकही मोठा प्रकल्प विदर्भात आला नाही. विदर्भातील तरुणांना रोजगार मिळाला नाही.रामदेव बाबा यांच्या पतंजलीचा मोठा प्रकल्प नागपूरमध्ये येणार असे सांगितले जात होते .परंतु तो ही अद्याप आलेला नाही. विदर्भातील जनतेवर व येथील बेरोजगारांवर अन्याय करणारे व विदर्भाच्या मातीशी बेईमानी करणारे गुजरातच्या नेत्यांना मुजरा करतात ही फार मोठी शोकांतिका आहे. येणाऱ्या काळात विदर्भवादी अश्या बेईमानांना धडा शिकविणार व त्यांना त्यांची जागा दाखविणार अशी खोचक प्रतिक्रिया राजू झोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आज दिली.

Post a Comment

0 Comments