Advertisement

77 वा प्रजासत्ताक दिन नांदगाव येथे उत्साहात साजरा ग्रामविकासासाठी सदैव तत्पर – प्रशांत बांबोडे यांची ग्वाही

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क 👇


77 वा प्रजासत्ताक दिन नांदगाव येथे उत्साहात साजरा

ग्रामविकासासाठी सदैव तत्पर – प्रशांत बांबोडे यांची ग्वाही

नांदगाव | प्रतिनिधी

77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नांदगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ग्रामविकासासाठी सदैव तत्पर असलेले माजी सरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांबोडे यांनी आपले मनोगत व्यक्त करत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची ठाम भूमिका मांडली.

कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नांदगावचे माजी उपसरपंच व शाळा समितीचे माजी अध्यक्ष विजय जाधव यांनी गावातील विविध विकासकामांबाबत प्रकाश टाकत पुढील काळात अधिक गतीने विकास व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच ग्रामविकासाची धुरा प्रशांत बांबोडे यांच्याकडून सक्षमपणे सांभाळली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यास प्रत्युत्तर देताना प्रशांत बांबोडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की,
“गावातील रखडलेली विकासकामे, डावी-कडवी योजना, शालेय इमारत, निर्लेखित प्रश्न, शौचालयांची समस्या तसेच स्मशानभूमीचा प्रश्न यासह सर्व मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देऊन मार्गी लावण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन.”

या कार्यक्रमास नांदगावच्या सरपंच हिमानीताई वाकुडकर, उपसरपंच सागरभाऊ देऊरकर, जिल्हा परिषद हायस्कूलचे माजी अध्यक्ष उमेशभाऊ इनामदार, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकरजी बांबोडे (अध्यक्ष, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा) यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

तसेच यावेळी अंगणवाडी सेविका, अंगणवाडी कार्यकर्त्या, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन गावचे माजी सरपंच तथा पत्रकार जेवणदाजी गेडाम, सामाजिक कार्यकर्ते मधुकररावजी पवार, विजय जाधव व गावातील प्रतिष्ठित नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती.

प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा अत्यंत आनंदी व प्रेरणादायी वातावरणात पार पडला. असा उपक्रम दरवर्षी अधिक व्यापक स्वरूपात साजरा करण्यात यावा, अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन व यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक खंडारकर सरशिर्के सर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. देशभक्ती, एकता आणि विकासाचा संदेश देणारा हा कार्यक्रम नांदगावकरांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

दरारा 24 तास न्यूज नेटवर्क


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या