नागपूर / चक्रधर मेश्राम दि. 28/11/2022:- ओबीसींच्या न्याय हक्क व अधिकारांसाठी भारतीय संविधानात ३४० वे पहिले कलम ओबीसींसाठी नमूद करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने संविधानानेच ओबीसींना सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र आजतागायत ओबीसींना त्यांचे हक्क व अधिकार कोणत्याच राज्यकर्त्यांनी मिळू दिले नाही व त्यासाठीच मागील कित्येक दशकापासून ओबीसींचा लढा सुरू आहे. सोबतच महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या जिवन कार्यातून समतेचा व न्यायाचा संदेश दिला. त्यांचा स्मृती दिन समाजातील विविध घटकांनी त्यांच्या हक्काची जाणीव जागृती होण्यासाठी साजरा करावा, यासाठी दोन्ही दिवस ओबीसी समाज बांधवांनी प्रेरीत होवून साजरे करावे. ओबीसी समाजबांधवांनी गावोगावी घरोघरी दिंड्या, रॅली, प्रभात फेरी, व्याख्यान, प्रबोधन, सभा, मिरवणूक आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठ्या जल्लोषात संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन साजरा करावा, असे आवाहन ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांनी केले आहे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे एस.सी. एस.टी. व्ही.जे.एन.टी. व ओबीसी समूदायासाठी त्यांचे हक्क व अधिकार बहाल केले. त्यामुळेच विविधततेने नटलेल्या या देशात सर्व जात समुदायाला त्यांचा सर्वांगीण विकास साधण्याची संधी मिळाली. हीच संधी ओबीसींना संविधानाने उपलब्ध करून दिली आहे. देशात संविधान सर्वोच्च आहे. संविधानच या देशातील प्रत्येक घटकाचे उत्थान करु शकते व करीत आहे.महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यांच्या कार्यातून आयुष्यभर शिक्षण, समानता, स्वातंत्र्य, अधिकार यासाठी लढा दिला. समाजात सर्वांगीण जागृती घडवून आणली. त्यांचे कार्य मोठे आहे.म्हणून ओबीसी समाजाने घरापासून सुरुवात करून आपआपल्या परिसरात संविधान दिन व महात्मा फुले स्मृती दिन मोठ्या उत्साहात साजरा करावा. समाजात जाणीव जागृती होईल, असे कार्यक्रम घ्यावे, असे आवाहन डॉ. अशोक जीवतोडे यांनी ओबीसी समाजबांधवांना केले आहे.
0 Comments