यवतमाळ: वसंतराव शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाला जिवंतपणी मृत असल्याचे घोषित करण्याचा प्रकार उघडकीस आला. दरम्यान रुग्णाच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता संबंधित रुग्ण हा ऑक्सिजन लावून उपचार घेत होता. या प्रकारामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. असा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून रुग्ण नातेवाईकाने याप्रकरणी जिल्हाधिकारी अमोल हेगडे यांच्याकडे तक्रार देत कारवाईची मागणी केली आहे.
बाबुळगाव तालुक्यातील दिघी पुनर्वसन येथील देवेंद्र ज्ञानेश्वर कावणकर यांच्या वडिलांना 30 एप्रिलला आजारपणामुळे शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. निमोनियाची लक्षणे व ऑक्सिजन लेवल कमी असल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची कोरोना चाचणी करून वार्ड क्रमांक 19 मध्ये उपचारार्थ दाखल करून घेतले. कोरोणाचा स्थितीचा अहवाल प्रलंबित असल्यामुळे त्याच वार्डात उपचार सुरु होते. परंतु प्रकृती अस्वस्थ असल्याने डॉक्टरांनी कोरोणा चाचणी अहवाल येण्यापूर्वीच त्यांना वार्ड क्रमांक 25 मध्ये कोविडमध्ये दाखल करून घेतले. व तशी माहिती देखील कुटुंबियांना देण्यात आली.
उपचार सुरू असताना सांगितले मृत
उपचार सुरू असतानाच 31 मार्चला रात्री अकरा ते बारा वाजताच्या सुमारास वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयाच्या कोविड वॉर्डातून देवेंद्र कावलकर यांना फोन द्वारे संपर्क साधून तुमच्या वडिलांचे हृदयाचे ठोके वाढले असून प्रकृती गंभीर असल्याचे माहिती देण्यात आली. वडिलांची प्रकृती गंभीर असल्याची बाब कानी पडताच देवेंद्र यांनी तात्काळ 30 किलोमीटर अंतर पार करून यवतमाळ गाठले व थेट covid- वार्डात जाऊन विचारपूस केली. तेव्हा एका महिला कर्मचाऱ्याने तुमच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती दिली. त्यानंतर देवेंद्र हे मृत वडिलांचे शरीर पाहण्यासाठी गेले असता साक्षात त्यांचे वडील ऑक्सिजन लावून बेड वर उपचार घेत असल्याचे आढळून आले.
या प्रकारानंतर रुग्णाचे नातेवाईक यांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. परंतु संबंधित डॉक्टरांनी चुकीची माहिती दिल्यामुळे कुटुंबीयांना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकारामुळे वैद्यकीय अधिकारांचा निष्काळजीपणा पुढे आला असून यापूर्वी देखील असा प्रकार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
चाचणी आली निगेटिव्ह
संबंधित रुग्णाची कोरोना चाचणी केल्यानंतर अहवाल प्रलंबित होता. असे असताना त्यांचेवर कोव्हिडं वार्डात उपचार सुरू करण्यात आले. दरम्यान 10 ते 12 तास उपचार घेतल्यानंतर त्यांच्या मृत्यूची बाबत चुकीची माहिती देण्यात आली. संबंधित रुग्णाचा कोरोना अहवाल देखील निगेटिव आला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
0 Comments