Ticker

6/recent/ticker-posts

*भावी आर एफ ओ विद्यार्थिनीचा संशयास्पद आढळला मृतदेह*



*भावी आर एफ ओ विद्यार्थिनीचा संशयास्पद आढळला मृतदेह*

पुणे/भोर : राज्य लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेत (एमपीएससी) राज्यात तिसरा क्रमांक पटाकावित वन परिक्षेत्र अधिकारीपदाला गवसणी घालणाऱ्या (आरएफओ) २६ वर्षीय तरुणीचा वेल्हे तालुक्यातील राजगड किल्यावरील सतीचा माळ परिसरात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला.
दर्शना दत्तात्रय पवार (वय २६, रा. कोपरगाव) असे मृत तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी वेल्हे पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

या प्रकरणी तरुणीचे वडील दत्तात्रय दिनकर पवार (वय ४७) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजगड किल्यावर रविवारी सकाळी गुराख्याला एक सडलेला मृतदेह आढळला. गुंजवणे गावचे पोलिस पाटील बाळकृष्ण रसाळ यांनी पोलिस ठाण्याला माहिती दिली. 


त्यानुसार सहायक निरीक्षक मनोज पवार, हवालदार औंदुबर अडवाल, ज्ञानदीप धिवार, योगेश जाधव आदी घटनास्थळी गेले. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी तरुणीचा मृतदेह बाहेर काढला. मृतदेहाजवळ मोबाइल आणि चप्पल सापडली. त्यावरून तक्रारदार वडिलांनी मृतदेहाची ओळख पटवली. त्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला.


पुरस्कारासाठी आली अन्...
'एमपीएससी' परीक्षेत यश संपादित केल्यामुळे एका खासगी संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दर्शनाचा सत्कार करण्यात येणार होता. हा कार्यक्रम दहा तारखेला टिळक रस्त्यावरील न्यू इंग्लिश स्कूलमधील गणेश सभागृहात झाला. मात्र, या कार्यक्रमानंतर तिचा फोन लागला नाही, असे तिच्या पालकांचे म्हणणे आहे. 

पालकांनी १२ जूनला संबंधित संस्थेत चौकशी केली असता, कार्यक्रमानंतर दर्शना तेथून गेल्याचे सांगितले. त्यामुळे तिच्या वडिलांनी १२ जूनला सिंहगड रोड पोलिस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दिली.
मित्रदेखील गायब
तरुणीच्या पालकांनी तिच्या मित्र परिवारात चौकशी केल्यावर ती राहुल दत्तात्रय हंडोरे याच्याबरोबर सिंहगड आणि राजगड किल्ला पाहण्यासाठी जाणार होती, असे समजले. दरम्यान, या सर्व प्रकारानंतर राहुल हंडोरे हादेखील बेपत्ता आहे. तरुणीच्या मृतदेहाजवळ तरुणाचे जर्किन सापडले आहे. मात्र, तिचा मित्र अद्याप घरी आला नसून, नातेवाइक त्याचा शोध घेत आहेत. यामुळे हा घातपात आहे, की अजून काही? याचा वेल्हे पोलिस तपास करीत आहेत.
साभार...
===========================
मृतदेहाची ओळख पटली आहे. ती तरुणी कोणाबरोबर तिकडे गेली होती, तिने जाण्यापूर्वी घरी काय सांगितले होते, हे कुटुंबीयांकडून जाणून घेऊन पुढील तपासाची दिशा ठरेल. सध्या तिचे कुटुंबीय मानसिक धक्क्यात आहेत.

- मितेश घट्टे, अतिरिक्त पोलिस अक्षीक्षक, पुणे ग्रामीण

Post a Comment

0 Comments