कोल्हापुर: शहरात धक्कादायक घटना समोर आली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्या दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी मारली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. साहिल मिनेकर असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर दत्तात्रय देवकुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. राजेंद्रनगरमध्ये परिसरात काल (18 जून) ही घटना घडली.
राजेंद्रनगरमध्ये नेमकं काय घडलं?
कोल्हापुरातील राजेंद्रनगर परिसरातील एका दुमजली इमारतीमध्ये काही तरुण रविवारी रात्री जुगार खेळत होते. याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रात्री अकराच्या सुमारास तिथे छापा टाकला. पोलिसांना पाहताच तरुणांची पळापळ झाली. पोलीस पकडतील या भीतीने साहिल आणि दत्तात्रय या दोन तरुणांनी इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन थेट खाली उडी मारली. मात्र दगडावर डोके आपटल्याने साहिल मिनेकरचा जागीच मृत्यू झाला, तर दत्तात्रय देवकुळे हा तरुण जखमी झाला.
पोलिसांनी साहिलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी 'सीपीआर'मध्ये पाठवला असून दत्तात्रयला उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. साहिल हा खासगी फायनान्स कंपनीत नोकरी करत असून त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी आणि दोन मुलं असा परिवार असल्याचं समजतं.
0 Comments