पालघर
दरारा 24 तास: दीड दिवसाचा गणपती विसर्जन करताना दोघांचा नाल्यात तर एकाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.
प्राप्त माहितीनुसार, बुधवारी सायंकाळी दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करण्यासाठी गेले असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने कोनसई येथील नाल्यात दोघांचा तर गो-हे येथील तलावात बुडून एकाचा मृत्यू झाला असून यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. जगत नारायण मौर्य( वय 38)सुरज नंदलाल प्रजापती (25)अशी कोनसई येथील नाल्यात तर प्रकाश नारायण ठाकरे( वय 35) गो-हे येथील तलावात बुडून मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत.
गणेश विसर्जन दरम्यान गणेश भक्तांचा उत्साह हा शिगेला पोहचतो. राज्यात ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात असतो. त्यामुळे शहरी भागात नाही पण ग्रामीण भागातच अधिकच्या दुर्घटना घडल्याचं दिसून येतं. गणेश भक्तांकडून कित्येक वेळेस नियमांकडे दुर्लक्ष केले जाते. तर शहराप्रमाणे पोलिस बंदोबस्तही नसतो. त्यामुळे ग्रामीण भागात गर्दी कमी असूनही अशा दुर्घटना घडतातच. सध्या गणेशोत्सवामुळे लोकांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
काही जणांच्या घरी दीड दिवसांचा गणपती बसतो. त्यामुळे बुधवारी काहींनी गणेशाचे विसर्जन केले. पण, वाडा येथे दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये तिघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे विसर्जन करताना काळजी घेण्याचे आव्हान पोलिसांकडून करण्यात येत आहे. कुठलेही अपघात टाळण्यासाठी गणेश भक्तांनी काळजीपूर्वक कार्य करावे असेही आवाहन पोलिसांनी केले आहे.
0 Comments