*▪️रानटी जनावरांकडून धान पिकाची नासाडी*
*● सव्वा एकरातील कापलेल्या धानाचा चुराडा : शेतकऱ्याचे हजारोचे नुकसान*
*पोंभूर्णा/ 09 डिसेंबर.*
दरारा 24 तास
शेतकरी नेहमीच नैसर्गिक आपत्तीने घेरलेला पाहायला मिळतो. यावर्षी तर शेतकरी पावसाळ्यापासूनच संकटाच्या घेऱ्यात पहायला मिळाला. पावसाळ्यातील काही पिके अतिवृष्टीत गेलीत. दोन आठवड्यापूर्वीच्या ढगाळ वातावरणाने तूर आणि हरभरा पिकाचे नुकसान झाले. मागील आठवड्यातील पावसाने कापनी केलेल्या धानावर चांगलेच संकट ओढावले. काही शेतकऱ्यांची धानाची बांधनी अजूनही व्हायची बाकी आहे. सारासार विचार करायचा झालाच, तर नैसर्गिक संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पूजलेली असतात. शेवटी काही शिल्लक उरले ते रानटी जनावरांच्या हमल्यात नेस्तनाबूत झालेले पाहायला मिळते.
पोंभूर्ण्यातील एक शेतकरी भुजंग पांडुरंग ढोले मागील दहा वर्षापासून ठेक्याची शेती करतो. भुजंग ढोले भूमिहीन असल्याने त्याला ठेक्याच्या शेतीशिवाय गत्यंतर नाही. यावर्षीसुध्दा भुजंग ढोले यांनी नकुल तानूजी वनकर यांची सव्वा एकर धानाची शेती ठेक्याने केली. धानाची कापनी केली, परंतु मागील आठवड्यापासून होत असलेल्या पावसामुळे त्याला धानाची बांधनी करता आली नाही. धान तसेच कापलेल्या स्थीतीत शेतभर पसरलेले होते. अशातच रानटी जनावराच्या कळपाने शेतात पसरलेल्या धानाचा चुराडा करत संपूर्ण पिकच नेस्तनाबूत केले. एक पोताभर धान सुध्दा घरी आणता येणार नसल्याचे भुजंग यांनी सांगीतले. वन्य प्राण्याच्या हानीमुळे झालेल्या पीक नुकसानीकरीता नुकसान भरपाई मिळावी म्हणून त्यांनी वन विभागाकडे अर्जाद्वारे मागणी केलेली आहे. वन कर्मचाऱ्यांकडून त्याच्या झालेल्या पीक नुकसानीबाबत मोका पंचनामा करण्यात आलेला आहे. नुकसान भरपाई कधी व किती मिळेल यासाठी मात्र शेतकरी भुजंग ढोले यांना वाट पाहावी लागणार आहे, एवढे मात्र खरे. 🔅
===========================
0 Comments