विजय जाधव/ अजित गेडाम
पोंभूर्णा : तालुक्यातील देवाडा बुज ग्रामपंचायत सरपंच माधुरी चुधरी यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंगळवार दिनांक ९ जानेवारी रोजी सर्वसाधारण सभेत सहा विरुद्ध शून्य मताने मंजूर झाला. देवाडा बुज ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचावरील अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी तहसीलदार शिवाजी कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी सात पैकी सहा ग्रामपंचायत सदस्य सभागृहात उपस्थित होते. तर सरपंच माधुरी चुधरी या अनुपस्थित राहिल्या. यावेळी देण्यात आलेल्या नोटिसांमधील विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. या दरम्यान ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता हुकमी कारभार करणे, विद्यार्थी तथा गावकऱ्यांना दाखल्यावर सही देण्यासाठी टाळाटाळ करणे, सरपंच ग्रामपंचायत मध्ये सतत गैरहजर राहणे अशा विविध कारणावरून ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच माधुरी चुधरी यांचे वर अविश्वास ठराव दाखल केला होता. या सभेत सरपंचाच्या विरोधात उपस्थित सर्व सहा सदस्यांनी मतदान केले. त्यात हेमंत आरेकर,अशोक मांडोगडे, सत्यवान पगडपल्लीवार,कल्पना राऊत,संगीता बदन,आशा तोडासे या सदस्यांनी ठरावाच्या बाजूने हात वर करून मतदान केले.सरपंच अनुपस्थित होत्या. त्यामुळे 6 विरुद्ध 0 मतांनी अविश्वास प्रस्ताव पारित झाला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सभेचे अध्यक्ष म्हणून तहसीलदार शिवाजी कदम,ग्रामसेवक प्रमोद सरकार उपस्थित होते.
0 Comments