नवे कायदे आले
आदेश धडकले
हताशपणे पाहतोस
डोके नाही भडकले
तोंड झाले मुके
बहीरे झाले कान
धष्टपुष्ट शरीर तुझे
नुसताच मारतोस ताण
संघर्ष करण्यासाठी, तू सज्ज आहेस का?
तपासून घे स्वतःलाच तू जीवंत आहेस का?
एसटी आणि शाळेचे
खाजगीकरण झाले
वृद्ध आणि गरीब मुले
देशोधडीला गेले
दत्तक दिली शाळा
पाटी दुसरी लागली
भली मोठी इमारत
जागेसोबत विकली
शिक्षण होईल महाग तेव्हा,अक्कल तुला येईल का?
तपासून घे स्वतःलाच तू जीवंत आहेस का?
तुला आता वाटते
शासन आपल्या दारी
दौरे झाले खाजगी
अन् खर्च सरकारी
चौकामध्ये झळकल्या
मोठ्या जाहिराती
शुभेच्छांचे फोटो पाहून
भरून येते छाती
पैशाची उधळपट्टी, तू सहन करतोस का?
तपासून घे स्वतःलाच तू जीवंत आहेस का?
शासनाच्या पैशावर
करीत आहेत वारी
कपटनीतीचे सरकार हे
पूर्वीपेक्षा भारी
कोलमोडली व्यवस्था
आरोग्य आणि शिक्षण
आता कुणी उरला नाही
करण्यास तुझे रक्षण
मुक्या बहिऱ्या लोकांचा आवाज होशील का?
तपासून घे स्वतःलाच तू जीवंत आहेस का?
0 Comments