घोसरी रस्त्यावरील डांबरावर मुरुमाचा मुलामा! काम निकृष्ट दर्जाचे
जुनगाव : पोंभुर्णा तालुक्यातील जिल्हा परिषद (बांधकाम) विभागांतर्गत घोसरी - फुटाणा पोचमार्गाचे डांबरीकरणाचे काम मध्यभागी रखडलेले आहे. त्या ठिकाणी मुरुमाचा मुलामा टाकण्यात आला आहे. याकडे कंत्राटदार व संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. या मार्गाने मार्गक्रमण करताना नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे.या मार्गाने क्षमतेपेक्षा जादा जडवाहतूक सुरू केल्याने घोसरी - फुटाणा रस्त्याचे डांबरीकरण उखडून ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. येथील जनतेच्या
मागणीनुसार मागील तीन महिन्यां अगोदर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले; परंतु दुरुस्तीचे काम थातूरमातूर केल्याने पूर्ववत डांबरीकरण उखडत आहे. एवढेच नव्हे तर मध्यभागातील डांबरीकरणाचे दुरुस्तीचे काम केलेच नाही, त्यामुळे जवळपास ५०० मीटरपर्यंतच्या डांबरीकरणावर मुरुमाचा मुलामा चढलेला आहे. तरी संबंधित अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने कंत्राटदाराचे चांगलेच फावत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष केंद्रित करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
0 Comments