Ticker

6/recent/ticker-posts

मुख्याधिकाऱ्याच्या गैरहजेरीमुळे नगर पंचायतीचा कारभार वाऱ्यावर -पोंभूर्णा येथील प्रकार : मुख्याधिकाऱ्याचे झाले दर्शन दुर्लभ



मुख्याधिकाऱ्याच्या गैरहजेरीमुळे नगर पंचायतीचा कारभार वाऱ्यावर

-पोंभूर्णा येथील प्रकार : मुख्याधिकाऱ्याचे झाले दर्शन दुर्लभ

पोंभूर्णा : व्हाईट हाऊस म्हणून परिचित असलेली
पोंभूर्णा नगर पंचायत अनेक कारणांमुळे वादग्रस्त आहे.पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष,अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कामचलाऊ धोरण, गावातील समस्या जैसे थे अश्या अनेक कामामुळे नगरपंचायत वाऱ्यावर सोडलेली आहे.

पोंभूर्ण्यातील अडलेली कामे पूर्ण करता येईल यासाठी राजूरा नगर परिषदचे मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे पोंभूर्णा नगर पंचायतचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला.मात्र महिना उलटून सुद्धा मुख्याधिकारी जाधव यांचे मुखदर्शनही होत नसल्याने व मोबाईल फोन नाॅट रिचेबल असल्याने नगरपंचायतचे कामे पुर्णपणे अडकलेली आहेत.एवढेच नव्हे तर नागरिकांचेही कामे खोळंबली जात आहे.मुख्याधिकारी यांच्या गैरहजेरीमुळे नगर पंचायतीचा कारभार वाऱ्यावर आहे.


पोंभूर्णा नगर पंचायतमध्ये बल्लारपूर क्षेत्राचे आमदार व पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एकाहाती सत्ता आली.पालकमंत्री यांच्या प्रयत्नातून पोंभूर्णा शहरात कोट्यवधीची विकास कामे करण्यात आली.काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. तर काही कामे बंद अवस्थेत आहेत.खोळंबलेली कामे पूर्ण करता येईल यासाठी रिक्त असलेल्या मुख्याधिकारी पदावर राजूरा नगर परिषदचे मुख्याधिकारी जाधव यांच्याकडे पोंभूर्णा नगर पंचायतचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला.मात्र प्रभारी मुख्याधिकारी जाधव यांचे नगरपंचायतमध्ये पायही भिरकत नसल्याने अनेक विकास कामे खोळंबली आहेत तर अनेक कामे रामभरोसे आहेत.मुख्याधिकारी यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचा भ्रमणध्वनीवरून ऐकू येत असलेली नॉट रिचेबलची टेप नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे.मुख्याधिकारीच येत नसल्याने नागरिकांची कामे खोळंबत आहेत मात्र या समस्यांवर नगरपंचायतचे कोणतेच सत्ताधारी पदाधिकारी बोलताना दिसत नाही.

शहरात सुरू असलेल्या विकासकामांच्या गुणवत्तेवर आता कुणीच वाली नसल्याने घसरणीवर येत असल्याचे पाहायला मिळत आहे.शहराच्या स्वच्छ सर्वेक्षणाकरिताची यंत्रणा गत एक ते दीड महिन्यापासून कासव गतीने धावत आहे.याचे परिणाम स्वरूप स्वच्छ सर्वेक्षणाची मोहीमच गुंडाळल्या जाणार आहे.अनेक दैनंदिन कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहे.मालकी हक्काच्या जागेच्या विवरणासहीत प्रॉपर्टी बाबतच्या अडचणी तसेच महत्त्वपूर्ण प्रमाणपत्रासाठी नागरिकांची फरफट होत आहे. नगर पंचायतची बैठक सुद्धा होतांना दिसत नाही.

शवपेटी व स्वर्गरथ गेल्या सहा-सात महिन्यांपासून नादुरस्थ आहे.शहरात अनेक वार्डातील हातपंप नादुरुस्त आहेत.तर  कार्यालयातील स्वच्छतागृहात घाणीचा साम्राज्य आहे.शहरातील अनेक योजना जैसे थे आहेत.या सर्व कारभाराचा रथ पुढे नेणारे मुख्याधिकारी गैरहजर राहत असल्याने महत्त्वपूर्ण व आर्थिक बाबीवरील निर्णय उपस्थित नगराध्यक्षवर सोडले जात आहे. नगर पंचायत कार्यालयातील काहींवर कामाचा अतिभार व काहींवर मर्जी ठेवल्या जात असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.प्रत्येक विभागातआधीच कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने गोंधळाची स्थिती आहे.

दिवाबत्तीच्या तक्रारीचे वेळोवेळी निवारण,स्वच्छतेबाबत लोकांच्या अडचणी तसेच उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पुरवठ्याबाबत येणाऱ्या अडचणी लक्षात घेता मुख्याधिकाऱ्यांची अनुपस्थिती लक्षणीय ठरली आहे. विकास कामांसोबतच दैनंदिन येणाऱ्या अडचणीबाबत येथील नगरसेवकांची हतबलता केविलवाणी ठरली आहे. भाजपची एक हत्ती सत्ता असलेल्या नगर पंचायतकडे पालकमंत्री लक्ष देत कार्यवाही करतील का हा मोठा प्रश्न पडला आहे.

मुख्याधिकारी महिन्यातून फक्त एक ते दोन  दिवस आले तर येतात नाहीतर ते येत नाही.अधिकारी नसल्याने येथील कर्मचाऱ्यांचा थाट सध्या आऊट ऑफ कंट्रोल होतांना पाहायला मिळत आहे. 
-------------------------------------

पोंभूर्णा नगर पंचायत प्रशासन वादात आहे. नगर पंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी जाधव यांची सततची गैरहजेरी आणि त्यांचे भ्रमणध्वनी नॉट रिचेबलमुळे नागरिकांना त्रास देणारी ठरत आहे.
------------------------------------
पोंभूर्णा नगर पंचायतचे मुख्याधिकारी,अभियंता व कर्मचाऱ्यांचे दर्शन दुर्लभ झाले आहे.अनेक कामे,योजना ठप्प आहेत.जनतेला मूलभूत सोयी-सुविधे पासून वंचित राहावे लागत आहे.नगर पंचायत अनेक समस्यांचे माहेरघर झाले आहे.मुख्याधिकारी यांच्या निष्क्रिय धोरणाबाबत आवाज उठवून वरिष्ठ अधीकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येईल.व जनतेच्या व गावाच्या हितासाठी आंदोलन करण्यात येईल.

-- आशिष कावटवार,विरोधी पक्षनेता,नगर पंचायत,पोंभूर्णा

Post a Comment

0 Comments