ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीवर अतिक्रमण करून मोटर पंप लावणाऱ्या इसमावर कारवाई करावी!
ग्राम पंचायत अधिनियमाची पायमल्ली! गावकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन
चंद्रपूर:(विशेष प्रतिनिधी)
पोंभुर्णा तालुक्यातील घाटकुळ येथे ग्रामपंचायतीच्या मालकीच्या सार्वजनिक विहिरीवर गावातील इसमाने अतिक्रमण करून स्वतःच्या शेत कामासाठी वीहीरीवर मोटार पंप लावून गावातील नागरिकांना पाणी भरण्यास मज्जाव करत असल्याने,"चोर तो चोर आणि वरून शिरजोर"अशीच परिस्थिती येथे निर्माण झाली आहे.
ग्रामीण पातळीवर ग्रामपंचायत साठी अतिक्रमण हा अत्यंत संवेदनाशील विषय आहे. गावाच्या निरनिराळ्या सार्वजनिक वापरासाठी शासकीय जमिनी संबंधित ग्रामपंचायतीकडे विहित केलेल्या आहेत, गायरान जमीन, निरनिराळे सार्वजनिक उत्सव साजरे करण्यासाठी जमीन, स्मशान भूमी, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक तलाव इत्यादी मालमत्तेवर गावाच्या वहिवाटीचे हक्क आणि अधिकार असतात. परंतु या सार्वजनिक जमिनीचा वापर अनाधिकृत रित्या अन्य प्रयोजनासाठी करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. याचे ज्वलंत उदाहरण हे गाव आहे.त्यामुळे गावकऱ्यांच्या मूलभूत अधिकारावर अनिष्ट परिणाम होत असून गावच्या मूलभूत गरजा पूर्ण होताना दिसत नाही.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम नुसार ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण संदर्भातील तरतुदी नमूद केलेल्या असल्या तरी ग्रामपंचायत कारवाई करताना दिसत नाही. त्यामुळे नागरिक बेजबाबदारीपणाने वाघापासून आपली मनमानी गाजवताना दिसत आहेत. तालुक्यात अनेक गावात हा विषय गंभीर आहे. मात्र राजकारणासाठी विरोधाभास कशाला म्हणून याकडे लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत खास करून लक्ष देत नसल्याचे चित्र आहे.
घाटकुळ येथील इसम सुरेश बाबुराव धानोरकर यांनी ग्रामपंचायतीच्या विहिरीवर मनमानीने अतिक्रमण करून स्वतःचे मोटर पंप लावले असल्याची तक्रार तहसीलदार यांचेकडे गावकऱ्यांनी दिलेली आहे. या संबंधाने तहसीलदार महोदयांनी तात्काळ कारवाई करून सबंधित अतिक्रमण काढून सार्वजनिक विहीर सार्वजनिक उपयोगासाठी आणून द्यावी अशी मागणी विठ्ठल बुटले, वामन पावडे, संदीप सुंबटकर, अमर दयालवार, मंगेश देशमुख, संतोष रोहनकर, राकेश चौधरी, अरुण पावडे, यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तहसीलदार महोदय काय कारवाई करतात? याकडे गाववासी यांचे लक्ष लागले आहे.
0 Comments