- मुनगंटीवार यांनी आदिवासी समाजाला दिलेला शब्द केला पूर्ण
पोंभुर्णा, (दरारा 24 तास न्युज नेटवर्क)
आदिवासी समाजाच्या मेळाव्यात महामहिम राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी, पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्याचा शब्द दिला होता. तो त्यांनी तीन दिवसांत पूर्ण केला.
महिलांसाठी समर्पित चंद्रपूरमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला वीरांगणा राणी दुर्गावती यांचे नाव आणि आदिवासी समाजासाठी समर्पित पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची घोषणा केली होती. विशेष म्हणजे, दोन्ही मागण्या अतिशय तत्परतेने पूर्ण करून घेण्यासाठी मुनगंटीवारांनी विशेष प्रयत्न केले. पोंभुर्णा येथे १ ऑक्टोबरला आदिवासी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणारे, आदिवासी समाजासह संपूर्ण देशाच्या कल्याणाचा विचार करणारे भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव पोंभुर्णाच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्यात येईल, असा शब्द मुनगंटीवार यांनी दिला. त्यानंतर त्यांनी संबंधित विभागाला पत्र दिले. पण, तेवढ्यावर ते थांबले नाहीत.
यासंदर्भात संबंधित विभागाशी, मंत्र्यांशी संपर्क साधून पाठपुरावा केला. तीन दिवसांत शासन निर्णय निघाला. ४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आलेल्या यादीत पोंभुर्णाच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान वीर बिरसा मुंडा यांचे नाव देण्यासंदर्भात उल्लेख आहे.
या निर्णयामुळे आदिवासी समाजात आनंदाचे वातावरण आहे. भगवान वीर बिरसा मुंडा यांच्या कर्तृत्वाचा केवळ आदिवासी समाजालाच नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे. त्यामुळे अतिशय आनंद देणारा हा निर्णय आहे, अशी भावना मुनगंटीवारांनी व्यक्त केली.
0 Comments