Advertisement

बेंबाळ पोलीस चौकीच्या खांद्यावर 32 गावांची जबाबदारी; फक्त तीनच कर्मचारी, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

बेंबाळ पोलीस चौकीच्या खांद्यावर 32 गावांची जबाबदारी; फक्त तीनच कर्मचारी, कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह


- गुन्हेगारी वाढीचा फटका; ग्रामस्थांनी कर्मचारी वाढवण्याची केली मागणी

जुनगाव (ता. पोंभुर्णा ) –
बेंबाळ पोलीस चौकीवर सध्या केवळ तीन पोलिस कर्मचारी कार्यरत असून, त्यांच्यावर तब्बल 32 गावांची सुरक्षा व्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे.

गुन्हे वाढतायत, पण चौकीत फक्त तिघेच

चोरी, घरफोडी, अवैध दारू विक्री, वाहतूक गैरव्यवस्था अशा विविध स्वरूपाच्या तक्रारी वाढत असून, केवळ एका सहाय्यक फौजदार व दोन शिपायांवर हे सर्व सांभाळण्याचे मोठे दडपण आहे. एवढ्या विस्तीर्ण भागासाठी ही संख्या अत्यंत अपुरी असल्याचे नागरिक सांगतात.

यंत्रणेवर ताण; तक्रारींसाठी उशीर

पोलीस कर्मचारी फक्त तीनच असल्याने गस्त, चौकशी, तक्रारींची नोंद, गुन्हे दाखल करणे, न्यायालयीन प्रक्रिया व वरिष्ठांचे कामकाज यामुळे वेळेवर मदत मिळणे कठीण होते आहे. काहीवेळा तक्रारी वेळेवर नोंदवल्या जात नाहीत, तर काहीवेळा तपासाला विलंब होतो.

स्थानीयांची संतप्त प्रतिक्रिया

“गावागावांमध्ये सतत काही ना काही घटना घडत असतात. मात्र चौकीवर पोचल्यावर कर्मचारीच नसल्याची वेळ येते. यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे. आम्ही वारंवार मागणी करूनही उपाय नाही,” असे एका ग्रामस्थाने सांगितले.

प्रशासनाने घेतली दखल

या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, “बेंबाळ चौकीच्या मनुष्यबळाबाबत अहवाल वरिष्ठ कार्यालयाला सादर करण्यात आला आहे. लवकरच आवश्यक ती पावले उचलली जातील.”

ग्रामस्थांची मागणी : चौकीला 'पोलीस स्टेशन'चा दर्जा मिळावा

32 गावांच्या सुरक्षिततेसाठी बेंबाळ चौकीला अधिक कर्मचारी नेमावेत किंवा चौकीला थेट पोलीस स्टेशनचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या