जनावरांची तस्करी उघड – गौरक्षा संघटनेचे आवाज उठवणं सुरू
जुनगाव प्रतिनिधी:
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातून वैनगंगा नदीच्या पल्याडून मोठ्या प्रमाणावर गायी व बैलांची तस्करी होत असल्याचं गंभीर वास्तव समोर आलं आहे. लखमापूर-बोरी परिसर हे या तस्करीचं मुख्य केंद्रबिंदू ठरत असून, येथून जनावरांना जुनगाव मार्गे थेट पोंभुर्णा तालुक्यातील घोसरी येथील जनावरांच्या बाजारात नेलं जातं.
मिळालेल्या माहितीनुसार, लखमापुर बोरी परिसरात सध्या २० पेक्षा अधिक दलाल सक्रीय असून, हे दलाल जनावरांची बेकायदेशीर खरेदी-विक्री करीत आहेत. जनावरांचा बाजार घोसरी येथे भरवल्या जातो आणि तेथून जनावरे वाहने भरून थेट कत्तलखान्यांमध्ये पाठवली जातात. ही साखळी अत्यंत नियोजित आणि संघटित पद्धतीने कार्यरत आहे.
या गंभीर प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने समाजात संतापाची लाट पसरली आहे. गौरक्षा संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिवसेना विधानसभा प्रमुख विनोद भाऊ चांदेकर यांनी यावर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. चांदेकर यांनी सांगितले की, "गायी व बैलांची अशी बेकायदेशीर तस्करी ही केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर ती भारतीय संस्कृती व धार्मिक भावनांवर आघात आहे."
तसेच, त्यांनी संबंधित पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी त्वरित पावले उचलून या तस्करीत सहभागी असलेल्या दलालांवर कठोर कारवाई करावी, तसेच जनावरांचा बाजार बंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा:
या प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने बघेल काय, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थ, सामाजिक कार्यकर्ते आणि गौरक्षा संघटनांनी या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.
0 टिप्पण्या
Thanks for reading