जुनगाव (ता. पोंभुर्णा) – नांदगाव ते जुनगाव मार्गावर नुकत्याच घडलेल्या भीषण अपघातात पोलीस पाटील कान्होजी भाकरे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांत तीव्र संताप पसरला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
भाकरे हे त्यांच्या वाहनातून प्रवास करत असताना रस्त्यावर अचानक निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनाचा तोल गेला व अपघात झाला. या दुर्घटनेत अन्य दोघे प्रवासी गंभीर जखमी झाले असले तरी त्यांचे प्राण वाचले, मात्र भाकरे यांचा जागीच मृत्यू झाला.
कुटुंबावर दु:खाचा डोंगर
भाकरे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, भाऊ व इतर कुटुंबीय असा मोठा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा मृत्यू झाल्याने सर्वांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. स्थानिक ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्त्यांनी कंपनीकडून भाकरे कुटुंबीयांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी, अशीही मागणी केली आहे.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे काम ठरतेय अपघाताचे कारण
गोसेखुर्दच्या उजव्या कालव्याचे काम या भागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. या कामात अनेक तृट्या असून ठेकेदार कंपनीवर कोणत्याही प्रकारचा प्रशासकीय अंकुश नसल्याचे दिसून येते. सात किलोमीटरच्या डांबरी रस्त्यावर पाईपलाईन टाकण्याच्या नावाखाली रस्त्याला मधोमध फोडण्यात आले असून, त्यामुळे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे नागरिकांना वाहतुकीत प्रचंड अडथळे येत असून, वाहनधारकांचा जीव धोक्यात येतो आहे.
ब्रेकर बनले मृत्यूचे कारण
रस्त्यावर ठिकठिकाणी कोणतीही पूर्वसूचना न देता बनवले गेलेले अनियोजित ब्रेकर हे देखील अपघाताचे मुख्य कारण ठरत आहेत. रस्त्यावर अनेक ठिकाणी मधोमध रस्ता फोडून ब्रेकर सारखी अवस्था केली आहे.या ब्रेकरमुळे अनेक अपघात झाले असून, याकडे प्रशासनाचे व ठेकेदाराचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. अशा बेफिकीर व निष्काळजीपणामुळे एका जबाबदार पोलीस पाटलाचा जीव गेला आहे.
न्यायासाठी आवाज उठवला पाहिजे
या घटनेची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार कंपनीवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तसेच शासनाने भाकरे यांच्या कुटुंबाला तातडीने योग्य ती आर्थिक मदत द्यावी, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
0 टिप्पण्या
Thanks for reading