Advertisement

IPS अधिकाऱ्याविरोधात एट्रोसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी — पत्रकाराची तक्रार

IPS अधिकाऱ्याविरोधात एट्रोसिटी कायद्यांतर्गत कारवाईची मागणी — पत्रकाराची तक्रार


चंद्रपूर : दरारा 24 तास

जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक युट्यूब न्यूज चॅनल 'विदर्भ Live 24' चे संपादक व पत्रकार प्रणित तावडे यांनी वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) IPS नयोमी साटम यांच्याविरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (Atrocity Act) कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी आपल्या लेखी तक्रारीत जातीय द्वेषातून अन्यायकारक गुन्हा दाखल केल्याचा आरोप केला आहे.

पत्रकार प्रणित तावडे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, त्यांनी विविध वृत्तपत्रे, न्यूज चॅनल्स आणि 'विदर्भ Live 24' या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक प्रश्न, अन्याय आणि गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणले आहेत. मात्र, याच कामाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी डिझेल तस्करीविषयीची बातमी त्यांच्या चॅनलवर प्रसिद्ध केल्यानंतर, संबंधित IPS अधिकारी नयोमी साटम यांनी वैयक्तिक द्वेषातून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

तावडे यांनी आरोप केला आहे की, त्यांनी बातमीत कोणतेही खोटे किंवा अपमानास्पद विधान न करता केवळ प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पोलिस गणवेशातील छायाचित्र वापरले. तरीही संबंधित IPS अधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत, कायद्याच्या मर्यादा ओलांडून, हेतुपुरस्सर फसवा गुन्हा दाखल केला.

तावडे यांच्या म्हणण्यानुसार, "हे केवळ वैयक्तिक रागातून नव्हे, तर जातीय द्वेषातून घडले आहे. 'विदर्भ Live 24' या चॅनलचा लोगो अशोक चक्रासह असल्याने आणि ते अनुसूचित जातीशी संबंधित असल्याने सदर बातमी खटकली असावी. ही कृती दलित पत्रकाराच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घात असून मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न आहे."

या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, तावडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, विधी व न्याय विभाग तसेच अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे तक्रार केली आहे. त्यांनी मागणी केली आहे की, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित IPS अधिकाऱ्यांवर एट्रोसिटी कायद्यानुसार कठोर कार्यवाही करण्यात यावी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या