जुनगाव, ता. ५ जून (प्रतिनिधी) – पोभुर्णा तालुक्यातील जुनगाव येथील शेतकरी प्रमोद मार्कंडेय मंडोगडे यांच्या शेतातील आवारातून बैलांची जोडी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे मंडोगडे कुटुंबावर आर्थिक संकट कोसळले असून, सध्या शेतीच्या कामाची मोठी अडचण निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रमोद मंडोगडे हे आपल्या शेतातील शेतीकामासाठी बैलांची जोडी वापरत होते. मात्र,29 जुनच्या रात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या आवारात घुसून ही बैल जोडी चोरी केली. सकाळी उठल्यानंतर बैलांच्या जागी रिकामी गोठा दिसल्यावर त्यांच्या शोकांतिकेला सुरुवात झाली. या चोरीबाबत प्रमोद यांनी तातडीने मुल पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. सध्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. शेतकऱ्याने बैलांच्या जोडीवर आपले संपूर्ण शेतीचे अवलंबित्व ठेवले होते. त्यामुळे ही चोरी म्हणजे फक्त जनावरांची नव्हे, तर एका कष्टकरी शेतकऱ्याच्या श्रमांवर आणि भविष्यावर घाला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गावकऱ्यांनी या घटनेची तीव्र नोंद घेतली असून, पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर चोरांचा शोध घेऊन संबंधित शेतकऱ्याला न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे. तसेच शासनाने आर्थिक मदत जाहीर करून अशा संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा, अशीही मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.
– प्रतिनिधी
जुनगाव, पोभुर्णा तालुका
0 टिप्पण्या
Thanks for reading